सलग पावसाने भाजीपाला लागवडीवर परिणाम

एपीएमसी बाजारात भाजी दरात घसरण

तुर्भे : मागील महिन्यापासून भाजीपाल्याचे दर वाढले होते. टोमॅटो पाठोपाठ कोथिंबीर, मिरची, आले, मटार या भाज्यांच्या दरात तर दुप्पट-तिप्पट वाढ झाली होती. मात्र, आता हवामान स्थिर असल्याने बाजारातील भाजीपाल्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. परिणामी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये राज्यासह परराज्यांतून येणाऱ्या भाज्यांच्या दरात घसरण चालू झाली आहे.

यावर्षी जून महिन्यामध्ये प्रारंभी पाऊस काही प्रमाणात विलंबाने पडला. त्यानंतर सलग आलेल्या पावसाने भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला होता. त्यामुळे एपीएमसी बाजारात भाजीपाल्याची आवक अल्प झाली होती. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पाणी लागून भाज्या खराब झाल्याने एपीएमसी बाजारात भाज्या पोहचेपर्यंत त्या खराब होत होत्या. परिणामी आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले होते.

किरकोळ बाजारात हिरवी मिरची २०० रुपये किलो, मटार २०० रुपये किलो, आले देखील २०० रुपये किलो झाले होते. भेंडी ८० ते ९०, फरसबी १२० रुपये किलो, गवार ८० रुपये किलो, शिराळी दोडकी ८० रुपये, कारली ८० ते १०० रुपेय, सुरण ८० रुपये किलो प्रतिकिलो दर झाला होता. कोथिंबिरीच्या एक जुडीसाठी तर ५० रुपये मोजावे लागत होते. इतर पालेभाज्या तर बाजारातून हद्दपार झाल्या होत्या. त्यातल्या त्यात बाजारात येणाऱ्या काही पालेभाज्यांचे दर देखील दुपटी-तिपटीने वाढले होते. मेथीची जुडी ३० ते ४० रुपये झाली होती. मात्र, आता भाज्यांच्या दरात घसरण चालू झाली आहे.

किरकोळ बाजारातील भाजी दर
मटार - १०० रुपये किलो
टोमॅटो - १०० रुपये किलो
शिमला मिरची - ६० रुपये किलो
हिरवी मिरची - ६० ते ८० रुपये किलो
कारली - ६० रुपये किलो
गवार - ८० रुपये किलो
वांगी - ६० रुपये किलो
भोपळा - ५० ते ६० रुपये किलो
भेंडी - ६० रुपये किलो
चवळी शेंग - ८० रुपये किलो
पलावर - ६० रुपये किलो
कोबी - ५० ते ६० रुपये किलो
पालक, शेपू, मुळा, कांदापात, कोथिंबीर जुडी - २० ते २५ रुपये 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चंदनवाडी शिवसेना शाखेत ध्वजारोहण