समतादूतांचा पुणे ते मंत्रालयापर्यंत पायी लाँग मार्च  

समतादूतांचा पायी लाँग मार्च सीबीडीत दाखल  

नवी मुंबई : सामाजिक न्याय विभागामध्ये समतादूतांचे समायोजन करण्यात यावे तसेच समाजकल्याण विभागाचे कार्यालय तालुकास्तरावर सुरु करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सर्व समतादूतांनी क्रांतीदिनापासून पुण्यातील बार्टीच्या मुख्यालयापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लाँग मार्च काढला आहे. हा लॉँगमार्च मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी सीबीडी बेलापूरमध्ये दाखल झाला असून उद्या हा लाँग मार्च मुंबईत दाखल होणार आहे. या लाँग मार्चमध्ये महाराष्ट्रातील सर्व समतादूत सहभागी झाले आहेत.  

समाजकल्याण विभागाच्या विविध योजना गाव व तालुकास्तरावर पोहचावेत यासाठी 9 वर्षापुर्वी समतादूतांची कंत्राटी पद्धतीवर नेमणुक करण्यात आली होती. तेव्हांपासून हे समतादूत बार्टीच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाच्या विविध योजना गाव व तालुकास्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे काम करत आहेत. प्रत्यक्ष गरजू लाभार्थ्याना लाभ पोहोचविण्यासाठी अविरत कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे फुले, शाहु, आंबेडकर, संत महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत नेण्याचे कार्य हे समतादूत करत आहेत. मात्र शासनाने गेल्या 9 वर्षामध्ये या समतादूतांच्या मानधनात 1 रुपयांची सुद्धा वाढ केलेली नाही. अद्याप त्यांना फक्त 12,500 रुपये इतके मानधन दिले जात आहे. या मानधनातील 4 ते 5 हजार रुपये हे प्रवासात खर्च होत असल्याने उर्वरीत 7 हजार रुपयात आम्ही कुटुंब कसे चालवायचे?असा प्रश्न या समतादूतांकडून उपस्थित केला जात आहे.  

राज्यभरात बार्टीच्या माध्यमातून कार्यरत असेलल्या सर्व समतादूत यांचे समाजकल्याण विभागात समायोजन करुन समाजकल्याण विभागाचे कार्यालय तालुकास्तरावर सुरु करण्यात यावे, यासाठी समतादूतांनी वेळोवेळी शासन दरबारी, मंत्रालयात, निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच उपोषण देखील केले आहे. समतादूतांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्र.वि.देशमुख यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी बार्टीच्या महासंचालकांना पत्रव्यवहार करुन समतादूत यांचे सकाजकल्याण विभागामध्ये  शासन सेवेत समायोजन करण्याबाबत स्वंयस्पष्ट अहवाल सादर करण्याचे सुचित केले होते. त्यानुसार बार्टी मुख्यालयाद्वारे 18 मे 2023 रोजी मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्र.वि.देशमुख यांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये समायोजन करण्याबाबत सकारात्मक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.  

परंतु, अद्याप सदर अहवाल मंत्रालयस्तरावर प्रलंबित असून तालुकास्तरावर समाजकल्याण विभागाचे कार्यालय व समतादूतांचे शासन सेवेमध्ये समायोजनाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी व सामाजिक न्याय विभागामध्ये समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व समतादूत 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून बार्टी मुख्यालय पुणे ते मुंबई मंत्रालया पर्यंत पायी लाँग मार्च काढण्यात आल्याची माहिती समतादूत सय्यद आखेब यांनी दिली.  

सामाजिक न्याय खाते मुख्यमंत्र्यांकडे असून मुख्यमंत्र्यांनी अनुभवी समतादूत यांचे शासन सेवेमध्ये समायोजन करुन तालुकास्तरावर समाजकल्याण विभागाचे कार्यालय सुरु करावे अशी मागणी समतादूतांच्या वतीने करण्यात आली आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवा अधिक बळकट