पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवा अधिक बळकट

नवीन तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन

पनवेल : पनवेल महापालिका २०१६ साली स्थापन झाली. या पाच सहा वर्षांत महापालिकेने आरोग्य सेवा बळकट करण्यावरती भर दिला असून पालिकेने बारा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळणार आहेत. ज्यांना कोणत्याही आरोग्य सेवा परवडत नाही त्यांच्यासाठी महापालिकेने हक्कांची निशुल्क आरोग्य केंद्रे बनविली आहेत.महापालिका पायाभूत सोयीसुविधा वरती भर देत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने कामोठे सेक्टर २२ येथे नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. आनंद गोसावी, उपायुक्त डाॅ.वैभव विधाते ,माजी नगरसेवक डाॅ.अरूणकुमार भगत , विजय चिपळेकर, प्रदीप भगत, महापालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील रिचारीका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आयुक्त  गणेश देशमुख म्हणाले सामान्यतः ५०,००० लोकसंख्येस १ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या नुसार पनवेल महानगरपालिकेस १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर आहेत, यामध्ये ९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्वीपासुन कार्यान्वित आहेत व ३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आज कार्यान्वित करण्यात येत आहेत. शासन निर्देशाप्रमाणे नागरिकांना येथे केस पेपर पासून ते सर्व चाचण्या निःशुल्क सुविधा मिळणार आहेत. या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दुपारी २-४ जेष्ठ नागरिकांसाठी राखीव वेळ ठेवून बाह्यरूग्ण सेवा देण्यात येणार आहे.नागरिकांनी हा दवाखाना पालिकेचा आहे असे न मानता तो आपला दवाखाना करुन घ्यावा.

दरम्यान आज खांदा काॅलनीमध्ये नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आयुक्त व माजी उप महापौर सीताताई पाटील, एकनाथ गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले,तसेच कळंबोली गावांमध्ये नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आयुक्त, माजी नगरसेवक रवींद्र भगत,अमर पाटील, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. आनंद गोसावी, उपायुक्त डाॅ.वैभव विधाते आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे मुळ उद्दीष्ट शहरी भागातील आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना विशेष :त झोपडपट्टी, झोपडपट्ट्यांसारख्या वस्त्या येथे वास्तव्य करणाऱ्यांना आरोग्य सेवा पुरविणे तसेच त्यांचा वेगवेगळया आजारांवर उपचारासाठी होणारा खर्च कमी करणे आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केद्रांमार्फत या आरोग्य सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहचवल्या जात आहेत व आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रुग्णालय दुर्घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल २५ ऑगस्ट पर्यंत सादर करा