कांदा दरवाढ कायम

बाजारात सध्या हलक्या प्रतिचा कांदा

वाशी : मागील काही दिवसात २०० रुपयांच्या घरात जाऊन बसलेला टॉमेटो खाली उतरत असताना आता कांदा दरवाढीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) घाऊक बाजारात १२ ते २१ रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा आता १५ ते २८ रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा दरवाढीचा परिणाम होऊन कांदा ३०-४० रुपयांनी विक्री होत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे साठवणुकीचा कांदा देखील खराब झाला आहे.  बाजारात सध्या हलक्या प्रतिचा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. एपीएमसी घाऊक बाजारात अवघा ३० टवव्ोÀ उच्चतम प्रतिचा कांदा दाखल होत असून, परिणामी उच्चतम प्रतिच्या कांद्याला उठाव असल्याने दर वाढ होत आहे. एपीएमसी बाजारात १४ ऑगस्ट रोजी २०७ गाडी कांदा आवक झाली आहे. सर्वात चांगल्या प्रतिच्या कांद्याला अधिक मागणी असून, त्याची आवक कमी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत असून, येत्या गणेशोत्सव पर्यंत कांदा दर वधारण्याची शक्यता  आहे. एपीएमसी कांदा बटाटा बाजारात आधी प्रतिकिलो १२ ते २१ रुपयांनी उपलब्ध असलेले कांदे आता १५ ते २८ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो ५ ते ६ रुपयांनी तर किरकोळ बाजारात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणांच्या तोंडावर कांदा आणखी महाग होण्याची शक्यता एपीएमसी घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

एपीएमसी बाजारात पावसाळी लाल कांदा दाखल होताच कांद्याचे दर आवाक्यात येतात. जून-जुलै मध्ये पावसाळी कांद्याची लागवड होते. मात्र, सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अद्याप कांदा लागवड झाली नसल्याने यंदा एक ते दोन महिन्यांनी नवीन कांद्याच्या हंगामाला विलंब होणार आहे. त्यामुळे कांदा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. - मनोहर तोतलानी, घाऊक व्यापारी - कांदा-बटाटा मार्केट, एपीएमसी. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिकेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा