१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन

महापालिका विभाग कार्यालयांमध्ये नाममात्र दरात राष्ट्रध्वज उपलब्ध

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवी वर्धापन दिन'ची सांगता होत असताना केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार याही वर्षी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा' अर्थात ‘हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येत आहे.

जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती चिरंतन तेवत रहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना मनात कायम रहावी या भावनेने आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्याच्या उद्देशाने ‘घरोघरी तिरंगा' अर्थात ‘हर घर तिरंगा' उपक्रम मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही राबविला जात आहे. या कालावधीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रत्येक घरावर नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे तिरंगा फडकविला जाणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने नागरिकांनी मागील वर्षी फडकविलेला आणि घरात जपून ठेवलेला तिरंगा यावर्षी फडकवावा. जर मागील वर्षीचा तिरंगा ध्वज उपलब्ध नसल्यास राष्ट्रध्वजाची उपलब्धता नागरिकांना सहजपणे व्हावी याकरिता केंद्र सरकार मार्फत प्रत्येक पोष्ट ऑफिसमध्ये जाऊन नागरिक ध्वज खरेदी करु शकतात.

महापालिकेनेही नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन घेण्यात अडचण येऊ नये याकरिता आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आठही विभाग कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देणारी सुविधा केंद्रे सुरु केली असून नागरिकांना सवलतीच्या दरात काठीसह केवळ १५ रुपये या दरात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली आहे.

भारतीय ध्वजसहिता २००२ मधील नियम १.२ नुसार भारतातील नागरिकांना राष्ट्रीय सणानिमित्त त्यांच्या घरांवर, कार्यालये, कारखाने, शालेय इमारती अशा विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. मात्र, ध्वज फडकविताना आणि त्यानंतरही भारतीय ध्वजसंहितेतील नियमांचे पालन करणे गरजेचे असून याबाबत महापालिका स्तरावरुन नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी दिलेले आहेत.

कोणत्याही उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होणा-या नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमातही उत्साहाने सहभागी होऊन आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवून देशाविषयी आपल्या मनात असलेला अभिमान व्यक्त करावा. १६ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवून जतन करुन ठेवावा. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘खेळ खेळूया मंगळागौरीचा'मध्ये महिलांकडून परंपरेचे सादरीकरण