महावितरण'तर्फे ईव्ही चार्जिंग स्टेशनला २ तासात वीज पुरवठा

वाशी मंडळ अधीक्षक अभियंता गायकवाड यांच्याकडून ‘महावितरण'च्या कर्मचाऱ्यांचे कौतुक

नवी मुंबई : ‘महावितरण'मध्ये सध्या २४ तासात वीजजोडणी देण्याचे उपक्रम सर्व परिमंडलात सुरु आहेत. त्याअनुषंगाने भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सदर मोहिमची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार भांडुप परिमंडल आणि वाशी मंडळ कार्यालयाकडून याबाबत नियमित पाठपुरावा घेण्यात येतो. या मोहिमेअंतर्गत ‘महावितरण'च्या उलवे शाखा कार्यालय तर्फे ईव्ही चार्जिंग स्टेशनला सर्व प्रक्रिया पूर्ण करुन अवघ्या २ तासात वीज पुरवठा देण्यात आल्याचे ‘महावितरण'तर्फे सांगण्यात आले आहे.

१० ऑगस्ट २३ रोजी उलवे मधील भगवती एम्पिरिया येथे राहणारे हेमंत हनुमान पाटील यांनी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगच्या वीज जोडणीसाठी ‘महावितरण'च्या उलवे शाखा कार्यालयात संपर्क साधला होता. यावेळी सहाय्यक अभियंता अमित पवार यांनी ‘महावितरण'च्या संकेतस्थळावर असलेल्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत केली. यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्वरित कोटेशन देऊन २ तासात लाईनमन मयूर आणि लाईनमन संकेत यांनी वीज जोडणी केली.

सीबीडी-बेलापूर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांच्या मार्गदर्शानाखाली ‘महावितरण'ने सदर कामगिरी पार पाडून जनमानसांत ‘महावितरण'ची प्रतिमा उंचावली आहे. वाशी मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी सदर अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक करुन भविष्यात अशीच कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणात्मक आणि प्रोत्साहित असलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी २ तासात वीज जोडणी देऊन ‘महावितरण'ने ‘ग्राहक सेवा हेच महावितरणचे उद्दिष्ट' असल्याचे सिध्द करुन दिले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन