देश कायम चिरतरुण राहिल हे पाहण्याची जबाबदारी नागरिकांची!

शूरविरांना वंदन सोहळा ठाणे महापालिकेत संपन्न

ठाणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशाचे स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षाचे झाले असेल तरी देश कधीही वृद्ध होत नाही. तो कायम चिरतरुण असतो. त्याचे हे चिरतरुणपण राखणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्या मातोश्री ज्योती राणे यांनी केले.

मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत शूरविरांना वंदन हा सोहळा शनिवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील शहीद वीर आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, परिवहन सेवा सभापती विलास जोशी, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे उपस्थित होते. ठाणे शहरातील एकूण ३२ शहीद आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यापूर्वी, सकाळी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर, कोलशेत तलाव येथे साकारण्यात येत असलेल्या अमृत वाटीकेमध्ये देशी प्रजातींच्या ७५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच, किसननगर शाळा क्रमांक २३ आणि ३३च्या प्रांगणात शहीद विरांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या शिलाफलकांचे अनावरण करण्यात आले. या अनावरण सोहळ्यास, शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांचे वडिल प्रकाशकुमार राणे, आई ज्योती राणे तसेच, शहीद मेजर मनीष हिराजी पितांबरे यांची आई हेमांगिनी पितांबरे, बहिण जान्हवी लोखंडे, मेव्हणे संजय लोखंडे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा झाला.

आचरण, विचार यातून देशाचे चिरतारूण्य टिकवण्यासाठी आपण सदैव सजग असायला पाहिजे. आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना एकत्र आणले. त्याबद्दल महापालिकेचे कौतुक आहे, असे उद्गारही ज्योती राणे यांनी काढले. वीरमाता म्हणून हा माझा सन्मान आहेच, पण वीरपत्नी म्हणून कौस्तुभची पत्नी कणिका ही आता सैन्यात कॅप्टन आहे. त्याचाही सार्थ अभिमान असल्याचे राणे यांनी नमूद केले.

आमदार संजय केळकर यांनी याप्रसंगी आजचा कार्यक्रम प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची ही संकल्पना आहे. संबंध देशभर असा सन्मान होतो आहे. ही अतिशय वेगळी आणि सगळ्यांना भावणारी संकल्पना आहे. ठाण्याच्या मातीचा हा गौरव आहे. ठाण्याला मोठा इतिहास आहे. या मातीतून अनेक मोठी माणसे होऊन गेली आहे. नवीन पिढीला या मातीचा इतिहास माहिती पाहिजे. त्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असतात. शहीद आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले, असे प्रतिपादन आमदार केळकर यांनी केले. ठाणे शहरातील अशोक स्तंभाची उभारणी आणि सेंट्रल जेलमधील स्मारक यांच्याविषयीही आमदार संजय केळकर यांनी भाषणात विवेचन केले.

याप्रसंगी, आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले की, अमृत महोत्सवाची सांगता ही अमृत काळाची सुरूवात आहे. देशाला समर्थ करण्याचे स्वप्न मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या कार्यक्रमाचे ठाणे महापालिकेने अतिशय नेटके आणि आत्मियतेने आयोजन केले. आजच्या सोहळ्यात नवीन पिढीही सहभागी झाली हे अतिशय प्रेरणादायी चित्र आहे.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याप्रसंगी सांगितले की, अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करताना गेले वर्षभर आपण विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. या सर्व कार्यक्रमांची सांगता माझी माती माझा देश या अभियानाच्या माध्यमातून होत आहे. भारताला विकसनशील देश बनविण्याचा संकल्प पंचप्रण ही शपथ घेवून सर्व नागरिकांनी केला. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीराना वंदन करण्यासाठी शहीद जवानांची नावे शिलाफलकावर लिहिली असून हा फलक शाळा क्र. २३मध्ये लावण्यात आला आहे. जेणेकरुन विद्यार्थी, जी देशाची भावी पिढी आहे, त्यांना नियमित या शूरवीरांचे स्मरण होईल. शिलाफलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वाक्य कोरण्यात आले आहे. जीवनाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी जगणे हीच स्वातंत्र्यसैनिकांना आपली खरी आंदराजली असेल. हा संदेश खूप महत्वाचा आहे, असेही आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले. मी माझ्या कर्तव्याचे पालन जर प्रामाणिकपणे करीत असेन, मी ज्या परिसरात किंवा शहरात असतो, ते शहर चांगले रहावे हा विचार आपण आपल्या पुढील पिढीला देणे म्हणजेच समाजहितासाठी किंबहुना देशासाठी हातभार लावणे. आज स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानासाठी त्यांच्या कुटुंबियातील चौथी पिढीदेखील आपण पाहिली म्हणजेच हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो आहे ही सकारात्मक बाब आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

आज हा कार्यक्रम करण्याचा मान ठाणे महापालिकेला मिळाला. स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यासाठी लढणारे वीरजवान व त्यांच्या कुटुंबियांप्रती महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या मनात विशेष स्थान असले पाहिजे. प्रशासकीय सेवेत काम करताना जर एखाद्या कामासाठी आपल्याकडे वीरजवानांचे किंवा स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय आले तर आपण त्यांना वाट पाहायला लावू नये. स्वत: त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे असलेले काम प्राधान्याने सोडविण्यास मदत केली पाहिजे. आजच्या कार्यक्रमातून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी हा बोध घ्यावा, असा सल्ला यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपायुक्त (मुख्यालय) गजानन गोदेपुरे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून 75 देशी वृक्षरोपांची लागवड