श्रीगणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ % वाढ

शाडू माती, कागदापासून बनविलेल्या ‘श्रीमुर्तीं'ना अधिक पसंती

वाशी : श्रीगणेशोत्सव सण अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभुमीवर बाजारात विविध रुपातील आकर्षक श्रीगणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत.  मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई मधील नागरिकांनी पर्यावरण पूरक ‘श्री'मूर्तींना जास्त पसंती दर्शवली आहे. त्यात मुर्तींपेक्षा शाडू आणि कागदापासून बनविलेल्या ‘श्री'मुर्तींना मोठी मागणी आहे.

येत्या १९ सप्टेंबर २०२३ पासून गणेशोत्सवाची धामधूम सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई शहरातील अनेक ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. ‘कोरोना'चा अनुभव पाहता शासनाने सार्वजनिक सणांवर निर्बंध घालत सर्व सण साधेपणाने साजरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात गणेशोत्सव सणाचा देखील समावेश होता. त्यामुळे कोविड काळात दोन वर्षे घरातच विसर्जित होणाऱ्या, लहान आणि पर्यावरणपूरक श्रीमूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे.
शासनाने मागील वर्षापासून सणांवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. मात्र, कोविड काळात नवी मुंबई मधील नागरिकांनी अंगीकारलेली शिस्त कायम ठेवली आहे. त्याचा परिपाक म्हणून यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शाडू मातीच्या आणि कागदी लगद्यापासून बनविललेल्या श्रीगणेश मूर्ती खरेदीकडे भक्तांची पसंती वाढत चालली आहे. परिणामी श्रीमूर्ती विक्रेत्यांकडे मागील वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी भर पडली आहे. यंदा ७० ते ७५ टक्क्यांहून अधिक शाडू मातीच्या आणि कागदापासून बनविलेल्या श्रीगणेश मुर्तींची मागणी वाढली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पीओपी पासून बनविलेल्या ‘श्री'मूर्ती खरेदी करु नका, असे दरवर्षी शासनामार्फत प्रबोधन करण्यात येते. यानुसार यंदा पीओपी श्रीमूर्तींच्या तुलनेत शाडू मातीच्या आणि कागदापासून बनविलेल्या सर्वाधिक ‘श्रीमूर्ती' विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण पूरक आणि आकर्षक ‘श्री'मुर्तींची बुकिंग करण्याकडे आतापासूनच कल वाढला आहे. नवी मुंबई शहरात एक हजार पासून पाच हजार रुपयांपर्यंत पर्यावरण पूरक श्रीमुर्ती उपलब्ध आहेत.

‘श्री'मूर्तीला अधिक सजावट
श्रीगणेशोत्सव निमित्त लाडक्या बाप्पाची मूर्ती पसंत करण्यास भाविकांची आतापासूनच लगबग सुरु आहे. मात्र, आपला बाप्पा अधिक सुंदर आणि रुबाबदार दिसावा याकरिता भाविकांनी अधिकच्या श्रीमूर्ती सजावटीवर भर दिला आहे. यात विविध आभूषण, फेटा, पितांबर यांचा समावेश आहे. त्यामुळे श्रीमूर्ती विक्रेते मागणी नुसार ‘श्री'मूर्तीला सजावट करुन देत असून, त्यासाठी ८०० ते १५०० रुपये दर आकारला जातो.

मागील वर्षी पेक्षा यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे यावर्षी ७० ते ७५ टक्के मूर्ती या इकोफ्रेंडली आणल्या आहेत. त्यात शाडू आणि कागदापासून तयार केलेल्या ‘श्री'मुर्ती अधिक आहेत. ८ इंचापासून ३ फुटांपर्यत घरगुती श्रीगणेशमूर्ती उपलब्ध आहेत. बाजारात रंग आणि कागदी पुठ्ठयांचे दर वाढल्याने यंदा श्रीगणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ % वाढ झाली आहे. - पंकज घोडेकर, ‘श्री'मूर्ती विक्रेता - श्री सदगुरु कृपा आर्ट, वाशी. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

देश कायम चिरतरुण राहिल हे पाहण्याची जबाबदारी नागरिकांची!