पनवेल महापालिका द्वारे दर्शनी भागात फलक  

यंदा पर्यावरण पूरक शाडूची श्रीमूर्ती, सजावट, कृत्रिम तलावात विसर्जन

खारघर :  येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या श्रीगणेशोत्सवात सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्रीभक्तांनी पर्यावरणपूरकच गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी पनवेल महापालिकेने ‘आमचं ठरलंय, यंदा पर्यावरणपूरक शाडूची श्रीमूर्ती, पर्यावरण पूरक सजावट आणि कृत्रिम तलावात विसर्जन' अशा आशयाचे फलक महापालिका हद्दीत लावून जनजागृती करण्यास सुरुवात केल्यामुळे पर्यावरण प्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत.

श्रीगणेशोत्सव यावर्षी येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणार आहे. येत्या १९ सप्टेंबर २०२३ रोजी बाप्पाचे आगमन होणार असून, २९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यावर्षी मागील वर्षीच्या तारखेपेक्षा यंदा बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना २० दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे पुजन करुन त्यांचे कृत्रिम जलकुंडात विसर्जन करण्यात यावे, यासाठी पर्यावरणप्रेमींकडून जनजागृती केली जाते. श्रीगणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, सजावटीकरिता प्लास्टिकचा वापर, थर्माकोलसारख्या विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर, घातक रासायनिक रंगाचा वापर, गुलालाची अतिरेकी उधळण, या सर्वामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. श्रीगणेश भक्तांनी पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करावा, यासाठी पनवेल महापालिकेने दीड महिना अगोदर पुढाकार घेवून जनजागृतीसाठी दर्शनी भागात ‘आमचं ठरलंय!, यंदा पर्यावरण पूरक शाडूची श्रीमूर्ती, पर्यावरण वस्तुंनी सजावट आणि कृत्रिम तलावात विसर्जन - परंपरा तीच' अशा आशयाचे जनजागृती करणारे फलक पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका हद्दीत लावल्याने पर्यावरण प्रेमी सुखावले आहेत.

खारघर परिसरात जवळपास ६० ठिकाणी सार्वजनिक तर ६ हजाराहून अधिक घरगुती ‘श्रीं'ची प्रतिष्ठापना केली जाते. खारघर वसाहतीच्या विकासात वाढ होत असल्यामुळे ‘श्रीं'च्या मूर्तीत देखील वाढ होत आहे. विशेष म्हणजे खारघर मधील घरकुल, बेलपाडा, फरशीपाडा आणि तळोजा कारागृह समोरील तलावात श्रीमूतींचे विसर्जन केले जात आहे. मागील वर्षी विसर्जन केलेल्या श्रीगणेश आणि  नवरात्री देवीचे अवशेष आजही तलावात दिसून येतात. त्यामुळेच यावर्षी पनवेल महापालिकेने ‘शाडूची श्रीमूर्ती, पर्यावरण पूरक सजावट आणि कृत्रिम तलावात विसर्जन' उपक्रम हाती घेतला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण विभागीय कार्यालय येथे कांदळवन संदर्भातील विविध विषयांवर बैठक संपन्न