ठाणे शहरातील काही भागात आज ५० टक्के पाणीपुरवठा

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिका आयुवतांचे आवाहन

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक-२६ आणि ३१ परिसराचा काही भाग वगळून), कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नंबर-२, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागात आज १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीमध्ये सुमारे ५० टक्के कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे.

उल्हास नदीवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अशुध्द पाणी पंपिंग स्टेशनच्या इनलेट स्क्रीन, चॅनल आणि पंप स्ट्रेनर मध्ये नदीमधून मोठ्या प्रमाणात कचरा आल्याने पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. सदर कचरा काढण्याच्या काळात आज १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुमारे ५० टक्के कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे पंपिग स्टेशनमध्ये अडकलेला कचरा काढण्याचे काम होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभाग समितींमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.

पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे तसेच पावसाळा असल्याने नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका द्वारे दर्शनी भागात फलक