गृहिणींना थोडाफार दिलासा

एपीएमसी बाजारात टॉमेटो सहित इतर भाजीपाला घसरण

 वाशी : मागील एक ते दीड महिन्यापासून किरकोळ बाजारात १६० ते २०० रुपये दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटो दरात घसरण झाली आहे. त्यासोबतच वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढल्याने वाटाणा, हिरवी मिरची आणि शिमला मिरची यांच्या दरात १५ ते २० % घसरण झाली आहे. त्यामुळे गृहिणींना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

वाशी मधील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक वाढली असून, भाज्यांचे दर उतरले आहेत. ११ ऑगस्ट रोजी एपीएमसी बाजारात ६६१ आणि मिक्स १२५ अशा ७८६ गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे आवक वाढल्याने वाटाणा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि शिमला मिरची यांच्या दरात १५ ते २० % घसरण झाली आहे. गेल्या महिना भरापासून ‘टोमॅटो'च्या दराने उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारात ‘टोमॅटो'चे दर प्रतिकिलो ९५ ते ११० रुपयांवर गेले होते. तर किरकोळ बाजारात १६० ते २०० रुपये ‘टोमॅटो'चे दर गेले होते. मात्र, एपीएमसी बाजारात ‘टोमॅटो'च्या दरात २० रुपयांनी घसरण झाली असून, आता प्रतिकिलो ‘टोमॅटो'चे दर ८० ते ९० रुपयांवर उतरले आहेत. तर किरकोळ बाजारात १४० ते १८० रुपये ‘टोमॅटो'चे दर झाले आहेत. ११ ऑगस्ट रोजी एपीएमसी बाजारात १३९५ क्विंटल टोमॅटो, वाटाणा १५७१ क्विंटल, हिरवी मिरची १५८८ क्विंटल, शिमला मिरची ५८८ क्विंटल आवक झाली आहे.

एपीएमसी घाऊक बाजारात २५ ते ३० % भाजीपाला आवक वाढली आहे. घाऊक बाजारात वाटाणा, हिरवी मिरची, टॉमेटो, शिमला मिरची आवक वाढली आहे. आधी ८० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असलेला वाटाणा आता ६०-६५ रुपये, हिरवी मिरची ५०-५५ रुपयांवरुन ३५-४० रुपये, शिमला मिरची ५०-६० रुपयांवरुन ३५-४० रुपये तर टोमॅटो १२०-१३० रुपयांवरुन आता १००-११० रुपयांनी उपलब्ध आहे. भाज्यांचे दर आवाक्याच्या बाहेर गेल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले होते. मात्र, आता भाज्यांचे दर उतरले असल्याने गृहिणींना दिलासा मिळत आहे.
भाजी  दर प्रतिकिलो           आता               आधी
वाटाणा               ६०-६५ रुपये             ८०-१२० रुपये
हिरवी मिरची        ३५-४० रुपये            ५०-५५ रुपये
शिमला मिरची       ३५-४० रुपये           ५०-६० रुपये
टोमॅटो                 ८० -९० रुपये           १०० -११० रुपये 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सव सुविधा उपलब्धतेसाठी विशेष बैठक संपन्न