गणेशोत्सव सुविधा उपलब्धतेसाठी विशेष बैठक संपन्न

स्वातंत्र्यदिनानंतर विभाग अधिकारी स्तरावर गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्याची सूचना

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. उत्सव आयोजन करताना घ्याव्या लागणाऱ्या आवश्यक परवानगीबाबत सूसुत्रता असावी आणि नागरिकांना त्या सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ऑनलाईन परवानगी प्रणाली, विसर्जन व्यवस्था, कृत्रिम तलाव निर्मिती यासह इतर सुविधा अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, स्वातंत्र्यदिनानंतर विभाग अधिकारी स्तरावर विभागीय क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी दिले आहेत.
सदर बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपायुक्त  दिलीप नेरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे आणि सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, तुर्भे विभागचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड, वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल बोंडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत गणेशोत्सव संपन्न होत असून तत्पूर्वी १ महिना आधीपासून गणेशोत्सवासाठी आवश्यक मंडप, स्टेज परवानगी मिळणेबाबत कार्यवाही सुरु होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंडळांना उत्सवासाठी मंडप उभारण्याकरिता परवानगी देण्याची नवी मुंबई महापालिकेने राज्यात प्रथमतः विकसित केलेली ई-सेवा संगणक प्रणाली लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी दिले. सदर प्रणालीद्वारे पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन या विभागांच्या ना-हरकत प्रमाणपत्रासह मंडळांनी अर्ज दाखल केल्यानंतर विभाग कार्यालय मार्फत जलद तपासणी करुन विनाविलंब परवानगी उपलब्ध करुन देण्याची परिमंडळ विभागप्रमुखांसह विभाग अधिकारी यांनी कार्यवाही करावी. लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मंडप उभारणी केली जाऊ नये, असे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सूचित केले. ही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

श्रीगणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी विसर्जनस्थळी कोणत्याही प्रकारची गर्दी न होता सुव्यवस्थित रितीने व्हावे या दृष्टीने मागील वर्षी २२ मुख्य विसर्जन स्थळांप्रमाणेच मुर्तीची विभागवार संख्या लक्षात घेऊन १३४ इतक्या मोठया प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन तपासणी करुन या संख्येत वाढ करण्यासाठी अभियांत्रिकी विभागाला कळविण्यात यावे. श्रीगणेशोत्सवाच्या अनुषंगाने शासनामार्फत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यावर त्या मंडळापर्यंत पोहोचविण्यात याव्यात, असेही आयुवतांनी सूचित केले.

विसर्जन स्थळावरील बॅरेकेटींग, विदयुत व्यवस्था, पर्यायी जनरेटर व्यवस्था, विसर्जनासाठी तराफे व्यवस्था, श्रीमूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवक नियुक्ती, कृत्रिम तलावांच्या ठिकाणची व्यवस्था, मुख्य विसर्जन स्थळांवर स्टेज अणि ध्वनीक्षेपक व्यवस्था, कृत्रिम ाणि नैसर्गिक अशा सर्व विसर्जन स्थळांवर सुके आणि ओले निर्माल्य कलश व्यवस्था, निर्माल्य वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था, मुख्य विसर्जनस्थळी वैद्यकिय पथक व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था अशा सर्वच बाबींचा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बारकाईने आढावा घेतला.

दरम्यान, उद्यान विभागाने सर्व विसर्जन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करुन विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या मूर्तींना अडथळा होणार नाही अशाप्रकारे वृक्ष छाटणी करण्याचेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

नवी मुंबई महापालिका सुव्यवस्थित रितीने गणेशोत्सव आयोजनासाठी पोलीस विभागासह सज्ज आहे. श्रीगणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन परवानगी प्रणालीचा उपयोग करुन घ्यावा आणि नागरिकांनी उत्सवाच्या उत्तम आयोजनात संपूर्ण सहकार्य करावे. त्याअनुषंगाने काही सूचना असल्यास नजिकच्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. - राजेश नार्वेकर, आयुवत  -नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पागोटे गावातील सर्व ग्रामस्थांना छत्री वाटप