घणसोली मधील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम

लक्ष्मीकांत पाटील यांची सिडको, महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार

नवी मुंबई : घणसोली सेक्टर-२१ मधील कापरी बाबानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यात येत असून, याबाबत घणसोली मधील माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांनी सिडको आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांनी लेखी तक्रार देऊनही या तक्रारीकडे सिडको आणि महापालिका अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

घणसोली सेक्टर-२१ मधील छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ ‘सिडको'ने संपादित केलेला राखीव भूखंड असून, या भूखंडावर अनधिकृत बांधकाम होत असल्याचे दिसत आहे. सदर भूखंड उद्यानासाठी आरक्षित ठेवण्यात आला असून, या भूखंडावर बेकायदा बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सिडको आणि महापालिका अधिकारी यांना कळविण्यात आले होते. परंतु, सदर अनधिकृत बांधकामावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याची भूमिका सिडको आणि महापालिका अधिकारी यांनी घेतलेली नाही, असे माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

आरक्षित भूखंडावर बांधकाम करणाऱ्या भूमाफियांना सिडको आणि महापालिका अधिकारी आश्रय देत असल्याचे दिसून येत आहे. शासन आणि सिडको तर्फे नवी मुंबई शहर प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आलेल्या तसेच ‘सिडको'ने उद्यानासाठी आरक्षित ठेवलेल्या राखीव भूखंडावर बांधकाम चालू असल्याचे दिसत असून, बेकायदा बांधकाम करणाऱ्या व्यवतींना सिडको आणि महापालिका अधिकारी यांचे सहकार्य असल्याचे दिसत आहे, असे लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

घणसोली सेवटर-२१ मधील उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर सुरु असलेले बेकायदा बांधकाम त्वरित थांबले नाही तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित केले नाही तर महापालिका आयुक्त यांच्या दालनात ठिय्या मांडून आंदोलन केले जाईल, असा इशाराही माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांनी तक्रारीत दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणथळ क्षेत्रावर तिरुपती बालाजी मंदिराची उभारणी