३ कोटी ६५ लाख १४ हजार रुपये खर्च

 विष्णुदास भावे नाट्यगृह मध्ये वाचनालय बांधण्याच्या कामास प्रारंभ

वाशी : नाट्य रसिकांची मागणी लक्षात घेता वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृह इमारतीमध्ये वाचनालय बांधण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे. वाचनालय उभारण्याकरिता ३ कोटी ६५ लाख १४ हजार रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृह मध्ये वाचनालय निर्मितीचे काम चालू करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सांस्कृतिक वारसा असलेल्या महापालिकेच्या या वास्तूत नाट्यप्रेमींसह सर्व पुस्तकप्रेमींना सुसज्ज असे वाचनालय उपलब्ध होणार आहे.  

वाशी मधील विष्णुदास भावे नाटयगृह, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकमेव नाट्यगृह आहे. या नाट्यगृहात नवी मुंबई मधील विविध ठिकाणावरुन नागरिक नाटकाचे प्रयोग बघण्यासाठी येतात. तसेच नाट्यगृह ठिकाण वाशी क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. नवी मुंबई शहरातील नागरिकांचा वाचनाचा छंद जोपासण्याकरिता या इमारतीत अद्यावत वाचनालय बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

विष्णुदास भावे नाट्यगृह ‘सिडको'कडून १३ मे १९९७ रोजी नवी मुंबई महापालिकाकडे हस्तांतर करण्यात आले आहे. नाट्यगृहातील आसन क्षमता तळमजला ७४३ आणि बाल्कनी २५८ मिळून एकूण १००१ आसन इतकी आहे. अनेकदा नाटक किंवा अन्य सांस्कृतिक कार्यक्रम चालू होण्यापूर्वी तसेच संपल्यानंतर अनेक रसिक या नाट्यगृहाच्या परिसरामध्ये काही वेळ असतात. त्यावेळी वाचनाची गोडी असलेल्या नागरिकांना वाचनाकरिता विविध ग्रंथ आणि अन्य साहित्य उपलब्ध व्हावे, अशी अनेक रसिकांची मागणी होती. याची नोंद घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नाट्यगृह मध्ये वाचनालय उभारण्याचे आदेश दिले. वाचनालय उभारण्याचे काम मे. ए. व्ही. कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याची तारीख असून, वाचनालयाचे क्षेत्रफळ १७१ चौ.मी. इतके आहे. वाचनालयात आसन क्षमता २५ इतकी असणार आहे. वाचनालयाकरीता टेबल, खुर्च्या, बुक शेल्वस पुरविणे, ग्रेनाईट, वूडन पलोरींग करणे, ग्लास ग्लेझींग बसविणे, साऊंड सिस्टीम बसविणे, फायर अर्लाम सिस्टीम बसविणे, रंगकाम करणे, विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका द्वारे निविदा प्रकिया