महापालिका द्वारे निविदा प्रकिया

नेरुळ मध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ पुतळा

वाशी : नवी मुंबई महापालिका तर्फे नेरुळ सेक्टर-१ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा उभारण्यासाठी सर्व परवानग्या आल्या आहेत. त्यामुळे पुतळा बसवण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात आली असून, त्यासाठी महापालिका तर्फे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ पुतळा बसविण्यासाठी ४७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

नेरुळ सेक्टर-१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चौक आहे. मात्र, या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ना पुतळा, ना कुठली तसवीर. त्यामुळे याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा, अशी मागणी ‘काशी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट'चे अध्यक्ष देवनांथ म्हात्रे यांच्यासह शिवप्रेमींनी केली होती. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने पहिल्या टप्प्यात चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण केले. तसेच शिवरायांच्या पुतळ्यासाठी आवश्यक इतर परवानग्यासह ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक होती. मात्र, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी देखील महापालिकेला प्राप्त झाली आहे. त्यामुळे नेरुळ सेक्टर-१ मध्ये शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा स्थापित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पुतळ्यासाठी निविदा प्रकिया राबवण्यात आली आहे. त्यासाठी ४७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रकिया पूर्ण होण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर नेरुळ सेक्टर-१ मध्ये शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका नेरुळ विभागीय उप अभियंता पंढरीनाथ चवडे यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 केंद्र शासन, राज्य शासन व महापालिका यांच्या निधीतून होणार कामे