‘मेरी माटी मेरा देश' अभियानाचे नवी मुंबईत भव्यतम आयोजन

शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान; वीरांच्या शिलाफलकासमोर प्रज्वलित दीप ठेवून अभिवादन

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश' अर्थात ‘मेरी माटी मेरा देश' असे राष्ट्रीय अभियान राबविले जात असून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी ‘अभियान'च्या पहिल्या दिवशी नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटनस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या अंतर्गत देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद आणि वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलक उभारण्यात आला असून त्यासमोर प्रज्वलित दीप ठेवून वीरांना वंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे पंचप्रण शपथ, अमृत वाटिकेची वृक्षारोपणाद्वारे निर्मिती, शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान, ध्वजारोहण आणि राष्ट्रगान असे विविध कार्यक्रम १ हजाराहुन अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार गणेश नाईक, आमदार रमेश पाटील, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते, ‘नगरपालिका प्रशासन संचालनालय'चे संचालक मनोज रानडे, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान; वीरांच्या शिलाफलकासमोर प्रज्वलित दीप ठेवून अभिवादन
याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते १९७१ च्या भारत पाकिस्तान युध्दात शहीद झालेले ‘इंडियन नेव्ही'चे लिडींग सिमेन आर. एस. सिंग यांच्या पत्नी मिरादेवी, पेट्टी ऑफिसर एन. एस. कठैत यांची कन्या अनिता गांधी, ‘इंडियन आर्मी'तील दफादार भोपाल सिंग यांच्या पत्नी हरमिंदर कौर तसेच २००१ मध्ये जम्मू-काश्मिर येथे संरक्षण कार्य करताना शहीद झालेले ‘इंडियन आर्मीे'तील नायक लक्ष्मण बाबू शेळके यांचे पुत्र अर्जुन शेळके यांच्यासह २००६ मध्ये ऐरोली येथील बँक दरोड्यात कायदा- सुव्यवस्थेचे रक्षण करताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव यांच्या पत्नी शुभांगी आढाव या शहीद वीरांच्या नातेवाईकांना सन्मानित करण्यात आले. या शहीद वीरांच्या नावासह ‘इंडियन नेव्ही'तील पेट्टी ऑफिसर मॅकेनिकल इंजिनियर राम सिंग, चिफ पेट्टी ऑफिसर एस. के. वर्मा तसेच ‘इंडियन आर्मी'तील लेपटनंट कोलोनल मनोजकुमार पिल्लई या शहीद वीरांच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख असणारा शिलाफलक ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे उभारण्यात आलेला आहे. या शिलाफलकासमोर प्रज्वलित दीप ठेवून मान्यवरांप्रमाणेच उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शहीद वीरांना अभिवादन केले.

तसेच १९ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री इर्शाळवाडीत झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत मदत कार्यवाही करताना निधन झालेले नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलातील सहा. केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांच्या पत्नी कविता ढुमणे यांनाही सन्मानित करण्यात आले.

 पंचप्रण शपथ सामुहिकरित्या ग्रहण
शासन निर्देशानुसार सकाळी १० वाजता सदर कार्यक्रमामध्ये ‘भारतास 204७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु, देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु, भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु' अशी शपथ महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समवेत सर्वांनी मातीचे प्रज्वलित दिवे हातात धरुन सामुहिकरित्या ग्रहण केली.

ध्वजारोहण, राष्ट्रगान द्वारे वंदना
मातीचे उजळते दिवे शहीद आणि वीरांचा नामोल्लेख असणाऱ्या शिलाफलकासमोर ठेवून मान्यवरांसह सर्व उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली. यानंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगानानंतर ‘भारतमाता की जय' या नामघोषात संपूर्ण परिसर निनादून गेला.

७५ देशी वृक्षारोपणाद्वारे अमृत वाटिका निर्मिती
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात ‘वसुधा वंदन' या उपक्रमांतर्गत ७५ देशी वृक्षरोपांची मान्यवर आणि उपस्थितांच्या शुभहस्ते लागवड करुन अमृत वाटिका निर्माण करण्यात आली. यावेळी ‘माझी माती माझा देश' या उपक्रमाची माहिती सर्वदूर प्रसारित होण्याकरिता तिरंगी रंगाचे फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले.

केंद्र सरकारच्या सूचनेनूसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई सारख्या लोकप्रिय पर्यंटनस्थळी भव्यतम स्वरुपात आयोजित केलेला ‘मेरी माटी मेरा देश' अभियानचा सदर विशेष कार्यक्रम एक हजाराहुन अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी  उपस्थित राहून यशस्वी केला.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३ कोटी ६५ लाख १४ हजार रुपये खर्च