शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘मेरी मिटटी मेरा देश' या अभियानातंर्गत ठामपा अधिकारी कर्मचारी यांनी घेतली 'पंचप्रण शपथ'
ठाणे मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ‘पंचप्रण शपथ'
ठाणे : ‘मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात माझी माती माझा देश या अभियान अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हातात माती घेवून पंचप्रण शपथ ग्रहण केली, तर देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शूरवीरांना हातात पणती घेवून आदरांजली अर्पण करण्यात आली.
या ‘अभियान'मध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभाग घेता यावा यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती कार्यालयांमध्ये, नाट्यगृहे, अग्निशमन केंद्र, शाळा, टीएमटी बस आगार या ठिकाणी देखील सदर अभियान राबविण्यात आले. या ‘अभियान'मध्ये मोठ्या संख्येने ठाणे महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाली होते.
यावेळी भारताला २०४७ पर्यत ‘आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु,' ‘गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करु', ‘देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु', ‘भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू', ‘देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु' अशी ‘पंचप्रण शपथ' सर्वांना देण्यात आली. सदर ‘अभियान'मध्ये मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
‘मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात ‘माझी माती माझा देश' अभियान अतंर्गत ९ ऑगस्ट त १५ ऑगस्ट या काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महापालिका मुख्यालय येथे ध्वजारोहण होणार आहे. तद्नंतर सकाळी १० वाजता वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत ७५ देशी प्रजाती रोपट्यांची लागवड माजिवडा- मानपाडा येथील कोलशेत तलावाजवळ केली जाणार आहे. तर सकाळी ११ वाजता ठाणे महापालिका क्षेत्रातील देशासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे ठामपा शाळा क्र.२२/३३ च्या प्रांगणात शिलाफलकावर लिहिली असून या शिलाफलकाचे अनावरण केले जाणार आहे.
या उपक्रमातील मुख्य सोहळा १२ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न होणार आहे. यावेळी दुपारी १२ वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान केला जाणार असून या कार्यक्रमास त्यांचे कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. ‘मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात ‘माझी माती माझा देश' अभियान अंतर्गत ठाणे शहरातील विविध ठिकाणची वंदन केलेली माती गोळा करुन ठाणे शहराचा एक कलश तयार केला जाणार आहे. सदर कलश दिल्ली येथे २७ ते ३० ऑगस्ट या काळात होणाऱ्या समारंभासाठी पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.