पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत पंच प्रण प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात

150 शाळांमधील 50 हजाराहून विद्यार्थ्यांची मोठ्या जोशपुर्ण वातावरणात मातीचे दिवे हातात घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा

पनवेल: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने  विविध कार्यक्रम हाती घेतले होते. या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने संपूर्ण राज्यात  व देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविले जात आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी या अभियानांतर्गत आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका मुख्यालय , सर्व शाळा,  मनपाचे सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरातील मॉल , गर्दीची ठिकाणे, 22 स्वच्छता दुत हजेरी बुथ, शासकिय कार्यालये अशा सर्व ठिकाणी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी सुमारे 10 हजाराहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमांत सहभाग नोंदविला.

‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत पंचप्रण शपथ घेताना सर्वांच्या हातामध्ये मातीचे दिवे देण्यासाठी महापालिकेच्यावतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालयामध्ये, मॉल, पालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, मनपाच्या 9 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच प्रभाग कार्यालये,स्वच्छता दुत हजेरी बुथ अशा सर्व ठिकाणी सुमारे 10 हजाराहून अधिक मातीच्या दिव्याचा पुरवठा करण्यात आला होता. मोठ्या उत्साहात सुमारे 10 हजार नागरिकांनी हातामध्ये मातीचे दिवे घेऊन ही पंच प्रण प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमानंतर केंद्र शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या लिंकवरती मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सेल्फी डाऊनलोड केल्या.

‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत पंचप्रण शपथ कार्यक्रम मनपा कार्यक्षेत्रातील सर्वशाळांनी राबवावा यासाठी आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 100 हून अधिक शाळांच्या प्रतिनीधीची 8 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पध्दतीने बैठक घेतली होती. त्यामुळे  जवळपास 150 शाळांमधील 50 हजाराहून विद्यार्थ्यांनी  मोठ्या जोशपुर्ण वातावरणात मातीचे दिवे हातात घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा घेतली. 

 या अभियानांतर्गत शासन निर्देशानुसार  9 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिका पाच विविध कार्यक्रम करणार आहे. त्यामधील आजचा पहिला कार्यक्रम होता. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये  दिनांक 11 ऑगस्ट रोजी शुक्रवारी लोकनेते दि.बा. पाटील शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याच दिवशी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची तमा न बाळगता शहीद झालेल्या स्वातंत्र सैनिक आणि वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलक लोकनेते दि.बा. पाटील शाळेमध्ये उभारण्यात येणार आहे. तसेच चौथ्या कार्यक्रमामध्ये  स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून लोकनेते दि.बा. पाटील शाळेमध्ये ‘वसुधा वंदन’ अर्थात 75 देशी वृक्षरोपांची लागवड करून ‘अमृत वाटिका’ तयार केली जाणार आहे. तर पाचव्या कार्यक्रमांतर्गत दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांना वंदन करून  त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मेरी मिटटी मेरा देश' या अभियानातंर्गत ठामपा अधिकारी कर्मचारी यांनी घेतली 'पंचप्रण शपथ'