मोरबे धरणाची जलवाहिनी फुटली

नवी मुंबई शहरात दिवसभर पाणी बंद

वाशी : नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी अजीवली गावाजवळ ९ ऑगस्ट रोजी सकाळी फुटल्याने नवी मुंबई शहरात दिवसभर पाणी संकट जाणवले. ८ ऑगस्ट रोजी नवी मुंबई महापालिकेने जलवाहिनीच्या देखभाल-दुरुस्ती करीता पाणी बंद ठेवले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई मधील रहिवाशांवर सलग दोन दिवस पाणी संकट ओढवले.

नवी मुंबई महापालिकेच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र आणि मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम ८ ऑगस्ट रोजी  करण्यात आले होते. यामुळे एक दिवस नवी मुंबई शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तसेच ९ ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार होता. मात्र, ९ ऑगस्ट रोजी पहाटे पाणी पुरवठ्याला सुरुवात होताच पुन्हा एकदा अजिवली गावाजवळ मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे जलवाहिनी मधून होणारा पाणी पुरवठा बंद करुन तत्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सायंकाळ पर्यंत सुरु राहिल्याने नवी मुंबई शहरात संध्याकाळ पर्यत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येऊन १० ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहीती महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली. मात्र, आधीच एक दिवस जलवाहिनी देखभाल दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवल्याने तर दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई मधील नागरिकांना सलग दोन दिवस पाणी संकटाचा सामना करावा लागला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत पंच प्रण प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात