पावसाळी कांदा उत्पादनाला फटका

पुढील दिवसात नागरीकांना कांदा रडवणार?

वाशी : मागील काही दिवसांपासून टॉमेटो सह इतर भाज्यांनी महागाईचा कळस गाठला आहे. त्यामुळे गृहिणींचे आधीच किचन बजेट कोलमडले असताना आता  आगामी दिवसात कांदा देखील नागरीकांना रडवण्याच्या तयारीत आहे. वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये ७ ऑगस्ट पासून पुन्हा कांद्याची आवक घटत  चालली आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आवक घटत राहिली तर पुढील दिवसात कांद्याचे दर आणखी भडकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. साठवणूक कांद्याचा दर्जा देखील घसरला आहे. त्यामुळे बाजारात सध्या हलक्या प्रतिचा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी उच्चतम प्रतिच्या कांद्याला उठाव असल्याने दर वाढ होत आहे. घाऊक बाजारात कांद्याच्या दरात प्रतिकिलो   २ ते ३ रुपये वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात आधी प्रतिकिलो १५-१८ रुपयांनी उपलब्ध असलेले कांदे आता १८-२२ रुपयांनी विक्री होत आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा ३० ते ३५ रुपयांना विक्री होत आहे. एपीएमसी बाजारात कांद्याची आवक कमी असून, ५० ते ६० %  हलक्या प्रतिचा कांदा दाखल होत आहे. तसेच पावसाने दडी मारल्याने नवीन कांदा लागवड केलेले उत्पादन देखील हाती लागणार नाही. त्यामुळे बाजारातील कांदा आवक घटणार आहे.

८ ऑगस्ट रोजी एपीएमसी बाजारात सरासरी पेक्षा कमी कांदा आवक झाली असून, बाजारात ७५ गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या पावसाने दडी मारली असून, पावसाळी कांद्याच्या उत्पादनाला फटका बसत आहे. त्यामुळे पुढील कालावधीत नवीन कांद्याचे उत्पादन कमी होणार असून, कांद्याचे दर आणखी वधारण्याची शक्यता आहे, अशी माहिती एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरबे धरणाची जलवाहिनी फुटली