महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीचे काम रखडल्याने  नागरिकांकडून नाराजी

१३ वर्षांपासून वाशी मधील बहुउद्देशिय इमारतीचे काम रखडलेलेच?

वाशी : वाशी सेक्टर-१४ मधील नवी मुंबई महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीचे काम  २०१० साली सुरु करण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराच्या चुकीमुळे मागील १३ वर्षांपासून महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीचे काम रखडलेले आहे. त्यामुळे या कामाच्या  दिरंगाईमुळे  नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महापालिका द्वारे वाशी सेक्टर-१४ मध्ये २०१० साली समाजमंदिराचे बांधकाम सुरु करण्यात आले. दोन वर्षांमध्ये महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, या इमारतीचा काही भाग खचल्यामुळे बांधकाम थांबविण्यात आले आहे. याबाबत सातत्याने स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला आहे. या कालावधीमधील तत्कालीन महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी २०१७ साली इमारतीची पाहणी केली. त्यांनी सदर इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचे तसेच यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाचे पुढे काय झाले ते अजूनही गुलदस्त्यात आहे.

महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीच्या कामासाठी महापालिका अंदाजे ५ कोटी ५९ लाख ८८ हजार ४४२ रुपये इतका खर्च करणार आहे. मात्र, महापालिकेच्या परंपरेनुसार या रवकमेत २४.९५ टक्के वाढ करुन ६ कोटी ९९ लाख ५७ हजार ५५८ रुपये इतक्या निधीला प्रशासकीय मंजुरी देऊन सदर काम देण्यात आले होते. त्यांना बांधकामासाठी २४ महिन्यांची मुदत दिली होती. परंतु, कंत्राटदार वारंवार मुदतवाढ घेत असल्याने आजतागायत तिचे काम झालेले नाही. सदर इमारत बांधकाम सुरु असतानाच खचली असल्याने ती पाडून नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. तर मागील सहा महिन्यांपूर्वी याच निर्माणाधीन इमारतीचे संरचना परीक्षण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल अजून प्रसिध्द करण्यात आला नाही. त्यामुळे या अहवालानुसार पुढील भूमिका घेण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका अभियंत्यांनी दिली. मात्र, मागील १३ वर्षांपासून महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीचे काम रखडल्याने  नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

इमारतीत मद्यपी आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा वावर?
वाशी सेक्टर-१४ मधील महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीचे काम मागील १३ वर्षापासून रखडलेले आहे. या इमारतीला ‘खंडर'चे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या इमारतीचा ताबा सध्या मद्यपी आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांनी घ्ोतला आहे, अशी माहिती येथील स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे गैरकृत्यांमुळे या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळी कांदा उत्पादनाला फटका