बोगस कर्मचारी घोटाळ्यात सिडको अधिकारी-कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात  

‘सिडको'तील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी सुरु

 नवी मुंबई : ‘सिडको'तील बोगस कर्मचारी घोटाळ्यात आता अधिकारी-कर्मचारी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. एकीकडे या प्रकरणी सीबीडी पोलिसांकडून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे. तर दुसरीकडे ‘सिडको'ने नेमलेल्या निवृत्त न्यायाधिशांमार्फत लेखा विभागातील ५ आणि कार्मिक विभागातील एका अधिकाऱ्यासह कर्मचारी यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. सदर विभागीय चौकशीमुळे सेवानिवृत्तीला आलेल्या काही अधिकारी कर्मचारी यांना नाहक चौकशीला सामोरे जावे लागत असून काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदोन्नतीचे कर्न्फमेशन रखडले गेले आहे.

‘सिडको'च्या आस्थापनेवर कुठल्याही पदावर नियुक्ती झालेली नसताना २८ कर्मचाऱ्यांची समन्वयक आणि सल्लागार या पदावर नियुक्ती झाल्याचे दाखवून या बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे सन २०१७ पासून ते आजतागायत प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये वेतन काढून सिडको महामंडळाची सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण  एप्रिल महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर सीबीडी पोलीसांनी तपास करुन या बोगस कर्मचारी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला ‘सिडको'च्या कार्मिक विभागातील सहाय्यक कार्मिक अधिकारी सागर तपाडिया याला अटक केली होती. सागर तपाडिया याने अकोला येथील माऊली मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी या पतपेढीत बोगस खाते उघडून त्यात २८ कर्मचाऱ्यांचे वेतन काढल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी माऊली मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी या पतपेढीचा व्यवस्थापक नंदकिशोर मुंजाळे याला या प्रकरणात सह आरोपी केले आहे.

दरम्यान, ‘सिडको'च्या कार्मिक विभागात अनेक वर्षे कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी या बोगस कर्मचारी घोटाळ्यास तितकेच जबाबदार असताना देखील सिडको व्यवस्थापन आणि दक्षता विभागाकडून त्यांना जाणूनबुजून चौकशीच्या ससेमिऱ्यातून बाहेर काढल्याचा आरोप ‘सिडको'त दबक्या आवाजात केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून त्यांना पदोन्नतीची खिरापत व्यवस्थापनाकडून वाटण्यात आल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  

सदर बोगस कर्मचारी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला आणि ‘सिडको'ला सुमारे ३ कोटीला गंडा घालणारा सहाय्यक कार्मिक अधिकारी सागर तपाडिया सध्या जामिनावर सुटला आहे. त्यामुळे सेवेतून निलंबित असलेला आरोपी सागर तपाडिया याची चौकशी त्वरित पूर्ण करुन व्यवस्थापनाने कारवाई न केल्यास ६ महिन्यानंतर सागर तपाडिया याला ‘सिडको'ला निलंबन काळात अर्धा पगार द्यावा लागणार आहे.

दोषींवर कठोर कारवाई करण्याची ‘युनियन'ची मागणी...
बोगस कर्मचारी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सागर तपाडिया याने स्वतःहून गुन्हा कबूल केला असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्यवस्थापनाने युध्दपातळीवर करुन त्याचा तातडीने सोक्षमोक्ष लावावा. जेणेकरुन यात विनाकारण कोणी अधिकारी-कर्मचारी भरडला जावू नये. तसेच या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्यवस्थापनाने करावी अशी मागणी ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'ने व्यवस्थापनाकडे केली आहे.    

‘सिडको'तील बोगस कर्मचारी घोटाळा प्रकरणात ‘सिडको'चा सहाय्यक कार्मिक अधिकारी सागर तपाडिया आणि अकोला येथील माऊली मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी या पतपेढीचा व्यवस्थापक नंदकिशोर मुंजाळे या दोघांविरुध्द न्यायालयात लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. या प्रकरणात ‘सिडको'तील ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रशासकीय कामकाजात निष्काळजीपणा आढळून आला आहे. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबत सिडको व्यवस्थापनाला पत्र पाठविण्यात आले आहे. -गिरीधर गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-सीबीडी पोलीस ठाणे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या बहुउद्देशिय इमारतीचे काम रखडल्याने  नागरिकांकडून नाराजी