०९ ऑगस्ट रोजी पंचप्रण शपथ ग्रहण कार्यक्रम

ठाणे शहरात ‘माझी माती माझा देश’ मोहिमेअंर्तगत विविध उपक्रम
      
ठाणे  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने ‘माझी माती माझा देश - मातीस नमन, शूरवीरांना वंदन’ या मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे ०९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचा मुख्य सोहळा शनिवार, १२ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने ‘माझी माती माझा देश’ या मोहिमेत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील उपक्रमांबाबत ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नुकतीच सर्व प्रमुख अधिकारी आणि विभागप्रमुख यांची बैठक घेतली. ‘माझी माती माझा देश’ या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेतले जावे. लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला जावा, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

 ‘माझी माती माझा देश’- ‘मातीस नमन, शूरवीरांना वंदन’ या मोहिमेत शिलाफलक उभारणी, वसुधा वंदन, पंचप्रण शपथ, ध्वजारोहण आणि स्वातंत्र्यसैनिक व शूरवीरांना वंदन असे पाच उपक्रम घेतले जाणार आहेत.
 
          बुधवार, ०९ ऑगस्ट रोजी स. १० वाजता, ठाणे महापालिका मुख्यालय, सर्व प्रभाग समिती कार्यालये, ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, दादोजी कोंडदेव क्रीडा संकूल, रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे, टीएमटी मुख्यालय आणि सर्व डेपो, सर्व अग्निशमन केंद्रे येथे पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे.
 
शनिवार, १२ ऑगस्ट रोजी, स. ९ वाजता मुख्यालयासह सर्व ठिकाणी ध्वजारोहण होईल. स. १० वाजता, कोलशेत तलाव परिसरात वसुधा वंदन अंतर्गत देशी प्रजातींच्या ७५ वृक्षांची अमृत वाटिका साकारण्यासाठी वृक्षारोपण केले जाणार आहे. तर, स. ११ वाजता किसन नगर येथे महापालिका शाळा क्र. २२/३३ च्या प्रांगणात शिलाफलकाचे अनावरण होईल. या शिलाफलकावर, ठाणे महापालिका क्षेत्रातील देशासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे लिहिली जाणार आहेत.  त्याच दिवशी, दु. १२ वाजता ठाणे महापालिका क्षेत्रातील स्वातंत्र्यसैनिक, त्यांच्या परिवारातील सदस्य, शहीदांचे कुटुंबिय यांचा सन्मान महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्याचबरोबर, ठाणे शहरातील विविध ठिकाणची माती गोळा करून ठाणे शहराचा एक कलश तयार केला जाईल. हा कलश दिल्ली येथे २७ ते ३० ऑगस्ट या काळात होणाऱ्या समारंभासाठी पाठविण्यात येणार आहे.
 

‘माझी माती माझा देश’ मोहिमेतील या सर्व कार्यक्रमांमध्ये महापालिकेच्या यंत्रणेसह ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका रुग्णालयात रोज २५ ते ३० रुग्ण