महसूल सप्ताह'ची सांगता

महसूल मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते कोकण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

नवी मुंबई : ‘महसूल सप्ताह' दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोकण विभागामधील सातही जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या नवनवीन संकल्पनेतून महसूल सप्ताह यशस्वीरित्या राबविल्याबद्दल ना. विखे-पाटील यांनी अभिनंदन केले. दरम्यान,  कोकण विभागातील नागरिकांचा ‘महसूल सप्ताह'ला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

राज्यात सर्वत्र १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘महसूल सप्ताह'चे आयोजन करण्यात आले होते. ‘महसूल सप्ताह'च्या सांगता समारंभानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी शितल देशमुख, नायब तहसिलदार श्रीकांत कवळे, लघुलेखक सुनिल वाघ, वाहन चालक सतिश देसाई, शिपाई संजय मोरे, हमाल प्रदिप भोसले, सेवानिवृत्त नायब तहसिलदार एकनाथ नाईक या अधिकारी आणि कर्मचारी यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शुभहस्ते महसूल दिन गौरव-२०२३ प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, अपर आयुक्त कोकण विभाग विवेक गायकवाड, उपआयुक्त महसूल कोकण विभाग तसेच अधिकारी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते.

 विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वात ‘महसूल सप्ताह'मध्ये संपूर्ण कोकण विभागात विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी या सप्ताह दरम्यान लक्ष्य घालून सप्ताह यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले आहेत. डॉ.कल्याणकर यांनी ‘महसूल सप्ताह'मध्ये कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यात भेट देवून  उपक्रम कसे राबविले जात आहेत, याचा आढावा घेतला. विभागातील सातही जिल्ह्यातील मंडळ स्तरावर, तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर ‘महसूल दिन'च्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांंचा गौरव करण्यात आला.

तसेच ‘युवा संवाद'द्वारे युवकांशी संवाद साधून दाखले वितरण करण्यात आले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य शिबीर घेणे, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. ‘एक हात मदतीचा' या कार्यक्रमांतर्गत नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देणे आणि इतर कार्यक्रम घेण्यात आले. ‘जनसंवाद'मध्ये शासकीय जमिनीचे भाडेपट्टयांचे नुतनीकरण, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद, संजय गांधी निराधर योजनेअतंर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, ई-पीक  पाहणी, सलोखा योजना राबविणे, आदि कार्यक्रम घेण्यात आले. तसेच महसूल आदालतींचेही नियेाजन करण्यात आले.

याशिवाय ‘एक गांव एक सलोखा' योजना राबविण्यात आली. ‘सैनिक हो तुमच्यासाठी' या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पाल्यांना विविध प्रकरणांचे दाखले देण्यात आले. अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. तर महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले.


‘महसूल सप्ताह'च्या शुभारंभाला विभागीय आयुक्त कार्यालयात ‘जगणे सुंदर' या विषयांवर प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित संपन्न झाले. यावेळी आर्थिक व्यवस्थापनावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या सप्ताह दरम्यान कर्मंचाऱ्यांची सेवापुस्तके अद्यावत करण्यात आली. कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे अंतिम करण्यात आली. ‘लक्ष्मी योजना' अंतर्गत सातही जिल्ह्यात लाभार्थ्यांना ७/१२ उताऱ्याचे वितरण करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

०९ ऑगस्ट रोजी पंचप्रण शपथ ग्रहण कार्यक्रम