बालके सदृढ रहण्यासाठी पनवेल महापालिका मिशन इंद्रधनुष्य 5.0

महापालिका क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य 5.0 ला सुरूवात

पनवेल  : बालके सदृढ रहावी यासाठी मिशन इंद्रधनुष्य 5.0 राबविले जात आहे. महापालिका क्षेत्रात लसीकरणासाठी महापालिकेच्यावतीने नेहमीच जनजागृती करत असते. आपल्या मुलांचे भविष्य उज्वल,सदृढ बनवायचे असेल लकांच्या पालकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. लसिकरणापासून वंचित राहीलेल्या बालकांनी व गर्भवती महिलांनी या लसीकरण मोहिमेचा आवश्य लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके तसेच गर्भवती महिला लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी मिशन इंद्रधनुष्य 5.0 राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतील पाहिली फेरीचे आज (7 ऑगस्ट) पीर करीम अली शाह उर्दू शाळेमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक मुकीत काझी, डॉ. सुरेखा मोहकर वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर,डॉ. नेहा म्हात्रे, परिचारीका, आशा वर्करस , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक मुकीत काझी व डॉ. सुरेखा मोहकर यांनी उपस्थितांना लसीकरणाचे महत्व सांगितले. तर वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांनी इंद्रधनुष्य 5.0 लसीकरण कार्यक्रमाची माहिती देऊन तीन टप्यामध्ये होणाऱ्या या लसीकरण कार्यक्रमाचे वेळापत्रक सांगितले. महापालिकेच्यावतीने मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी तळागाळापर्यंत हा लसीकरणाचा कार्यक्रम पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार मानले.

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. अर्धवट झालेले लसीकरण, तसेच लसीकरण न झालेली बालके ही संपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांच्या तुलनेत लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रूबेला आजाराच्या दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले असून, यासाठी केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यापासून तीन टप्प्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० या मोहिमेंतर्गत शून्य ते दोन वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभाथ्याचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दोन ते पाच वयोगटांतील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात 2193 लाभार्थ्यांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणार आहे .
ही मोहीम महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्याकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नियमित लसीकरण व मिशन इंद्रधनुष्य 5.0 अंतर्गत पालिका क्षेत्रातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीमध्ये 220 ठिकाणी लसीकरण सत्रे सुरू करण्यात आली आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीची कामे हाती