आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीची कामे हाती

नवी मुंबईत रस्ते दुरुस्ती कामांना गती

नवी मुंबई : १७ जुलै पासून २९ जुलैपर्यंत संततधार पाऊस कोसळून या कालावधीत ८७४.९० मि.मि. इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. या कालावधीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर नवी मुंबईतील परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून होते. त्या अनुषंगाने महापालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा दक्षतेने कार्यरत होती. आयुक्त नार्वेकर यांनी स्वतः भर पावसात नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा पाहणी दौराही केला होता.

आता पावसाची तीव्रता काहीशी कमी होऊन उघडीप मिळाल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे जलद हाती घेऊन सध्याचा श्रावणी सणांची तसेच आगामी गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेत या रस्ते दुरुस्ती कामांना गती देण्याचे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले होते. त्यानुसार दिघा ते बेलापूर या सर्वच विभागांतील रस्ते दुरुस्तीची कामे जलद गतीने हाती घेण्यात आली असून सर्व विभागातील कार्यकारी अभियंता आपापल्या विभाग कार्यालय क्षेत्रातील कामांवर तसेच शहर अभियंता संजय देसाई सर्वच रस्ते दुरुस्ती कामांवर पाहणी दौऱ्यांद्वारे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचे वार्षिक स्वरुपात देखभाल-दुरुस्ती कंत्राट करण्यात आले असून रस्ते दुरुस्तीची कामे वर्षभर नियमितपणे सुरु असतात. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील रस्ते खराब होण्याचे प्रमाण काहीसे कमी असून दुरुस्तीचा कालावधी मात्र जलद आहे. पावसाळी कालावधीकरिता अभियांत्रिकी विभागाने विभागनिहाय रस्ता दुरुस्ती विशेष पथके तयार केली असून सदर पथके आपापल्या विभाग क्षेत्रात फिरती राहून रस्ते दुरुस्तीची कामे करीत आहेत. विभागनिहाय ८ तसेच एमआयडीसी क्षेत्राकरिता २ असे १० कंत्राटदार रस्ते दुरुस्तीची कामे करीत असून या कंत्राटदारांमार्फत नियमितपणे रस्ते दुरुस्ती केली जात आहे. आपल्याला नेमून दिलेल्या क्षेत्रातील रस्त्यांची नियमित पाहणी करणे, आवश्यक त्या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करणे या कंत्राटदारांचे काम असून ४८ तासात दुरुस्ती कार्यवाही न झाल्यास या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.

मागील आठवड्यापासून पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने आयुक्तांच्या निर्देशानुसार रस्ते दुरुस्ती वेगाने करण्याकडे अभियांत्रिकी विभागामार्फत गतीमान कार्यवाही सुरु आहे. आकाराने लहान खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात येत आहे. विशेषत्वाने उड्डाणपुल तसेच अवजड वाहनांची रहदारी असणारे रस्ते या ठिकाणी मास्टिक अस्फाल्टचा उपयोग केला जात आहे. त्याचप्रमाणे खड्डा मोठा असल्यास तो समतल करुन सुस्थितीत आणण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आवश्यकता लक्षात घेऊन  अस्फाल्टींग द्वारे रस्त्याच्या काही भागांचे डांबरीकरणही केले जात आहे.

तशीही नवी मुंबईमध्ये नियमितपणे रस्ते पाहणी करण्यात येऊन आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येते. याशिवाय  महापालिकेच्या नागरिक तक्रार निवारण प्रणालीवर तसेच विविध माध्यमांद्वारे प्राप्त होणाऱ्या रस्त्यांबाबतच्या तक्रारींवर त्वरित दुरुस्ती कार्यवाही करण्यात येत आहे. रस्त्यांच्या तक्रारीबाबत नवी मुंबई महापालिकेने ८४२४९४८८८८ असा व्हॉटस्‌ॲप क्रमांक नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिलेला असून आपत्ती निवारण कक्षाचे टोल फ्री क्रमांक १८००२२२३०९/१० यावर तसेच महापालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीवर रस्त्यांविषयीच्या तक्रारी आणि सूचना नागरिक दाखल करु शकतात.

नवी मुंबई शहर समुद्रसपाटीच्या खालील पातळीवर वसलेले असून भरतीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते. सदर पाणी उपसण्यासाठी आणि जलद पाणी निचरा होण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुरेशा प्रमाणात पाणी उपसा पंपासह इतर आवश्यक व्यवस्था केली जात आहे. तरीही शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहत असल्याने त्याठिकाणी असलेल्या रस्त्यांच्या पृष्ठभागाची काही प्रमाणात हानी होते. यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेत रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले आहेत. श्रावणातील सण-उत्सव आणि आगामी गणेशोत्सव कालावधी लक्षात घेऊन रस्ते दुरुस्तीची कामे अधिक काळजीपूर्वक केली जात आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महसूल सप्ताह'ची सांगता