डॉक्टरांच्या सेमिनारमध्ये डॉक्टरचा मृत्यू  

 

डॉ. अभय उप्पे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन  

नवी मुंबई : डॉक्टरांच्याच सेमिनारमध्ये हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन नवी मुंबईतील एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी नेरुळ येथे घडली. या सेमिनारमध्ये २५ हून अधिक नावाजलेल्या डॉक्टरांचा समावेश असून देखील ते त्या डॉक्टरचा प्राण वाचवण्यात अपयशी ठरले. सदर घटनेमुळे नवी मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे.  
नेरुळ मधील कोर्टयार्ड बाय मेरीएट येथे आयोजित डॉक्टरांना देण्यात येणाऱया अद्ययावत ज्ञान उपक्रमांतर्गत (सीएमई) व्याख्यान देणारे नवी मुंबईतील सुप्रसिध्द चेस्ट फिजिशियन डॉ. अभय उप्पे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे जागीच निधन झाले. सदर सेमिनारमध्ये उपस्थित असलेल्या इतर डॉक्टर्सनी त्यांना कृत्रिम श्वसन (सीपीआर) देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न फोल ठरले.

या चेस्ट परिषदमध्ये डी.वाय.पाटील हॉस्पिटलमधील छाती व श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. अभय उप्पे (चेस्ट फिजिशियन) यांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांचा घसा दुखत होता, कदाचित काही संसर्ग (इन्फेक्शन) झाला असल्याने त्यांनी आपल्याला बरे वाटत नाही म्हणून ते सेमिनारमधून घरी जाण्यासाठी निघाले. परंतु हॉटेलच्या लिफ्ट जवळ आल्यानंतर डॉ. अभय उप्पे यांना छातीत जोरदार कळा आल्याने ते जमिनीवर पुर्ण कोलमडले. मदतीसाठी आवाज येताच काही डॉक्टरांची त्यांच्याकडे नजर गेल्यावर तेथे उपस्थित डॉक्टर्सनी लिफ्टजवळ धाव घेतली.

तेथे त्यांना लगेच सीपीआर देण्यात आला. लिफ्टच्याच बाजूला उपस्थित असलेल्या अपोलोच्या काही इन्सेटिव्हीस्ट डॉक्टरांनी ताबडतोब कार्डियाक ऍम्ब्युलन्स बोलावून घेतली. ११ मिनिटात रुग्णवाहिका हॉटेलला पोहचली. त्यांना ऍम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांच्यावर ऍम्ब्युलन्समध्येच उपचार सुरु करण्यात आले. ऍम्ब्युलन्स अपोलो हॉस्पिटलला पोहताच त्यांना कॅथलॅबमध्ये नेण्यात आले. तेथे चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट यांनी त्यांना वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, डॉ. अभय उप्पे  यांना वाचविण्यात त्यांना यश आले नाही.  

अखेर शेवटी त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात बोलविण्यात आले. त्यांची दंतचिकित्सक पत्नी, आई, आणि १८ आणि १५ वर्षांची दोन मुले तेथे पोहचल्यानंतर डॉ. अभय उप्पे  यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (मॅसिव्ह कार्डियाक अरेस्टने ) निधन झाल्याचे घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे दीड महिन्यांपूर्वी डॉ. अभय उप्पे यांनी नियमित सीटी अँजिओग्राफी केली होती. सदर रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगितले गेले.  त्यांच्या पार्थिवावर नेरुळ येथे  शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

द्रोणागिरी येथे रक्तदान शिबिर व पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन