स्तनपान सप्ताह निमित्त महापालिका मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन

डॉ. अभिजीत म्हापणकर यांची फेसबुक लाईव्ह जनजागृती

नवी मुंबई : १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत असून यानिमित्त बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी स्तनपानाचे महत्व महिलांना वेगवेगळ्या माध्यमांतून पटवून दिले जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

यावर्षी जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य ‘स्तनपानाचे सक्षमीकरणः नोकरदार पालकांसाठी एक बदल' असून त्याविषयी जनजागृती होण्याकरिता नवी मुंबई महापालिका मार्फत सुप्रसिध्द बालरोग तज्ञ तथा नवजात अर्भकतज्ञ डॉ. अभिजीत म्हापणकर यांच्या फेसबुक लाईव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी स्तनपानाचे महत्व विशद करीत मातांनी स्तनपान करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी महत्वाची माहिती दिली.

जागतिक स्तनपान सप्ताहात घोषवाक्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने नोकरदार महिलांसाठी सूचना करताना डॉ. म्हापणकर यांनी महिलांनी स्वतःचा हक्क बजावून प्रसुती रजा घेण्याचा आणि जास्तीत जास्त वेळ बाळासोबत राहण्याचा प्रयत्न करावा. त्यापुढील कालावधीतही शक्य झाल्यास पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ वर्क फ्रॉम होम करावे, असे सांगितले. काही कारणास्तव कामावर रुजू व्हावे लागल्यास सकाळी कामावर निघण्यापूर्वी आणि कामावरुन आल्यानंतर लगेच स्वच्छ होऊन बाळाला स्तनपान करावे, असेही डॉ. म्हापणकर म्हणाले.

दूध तयार करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोलॅक्टिन हार्मोन्स रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात स्त्रवतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त वेळा स्तनपान करण्याचा प्रयत्न करावा. प्रसुती झालेल्या महिलांनी घरी नसताना अंगावरील दूध स्वच्छ स्टीलच्या भांडयात काढून जतन करावे. दूध काढल्यानंतर त्या भांड्यावर तारीख आणि वेळ नमूद करून ठेवावी. साधारण तापमानाला दूध ४ ते ६ तास बाहेर ठेवता येऊ शकते. फ्रीजमध्ये १२ तास तसेच फ्रीजरमध्ये जास्तीत जास्त ७ दिवस ठेवता येऊ शकते. फ्रीजमध्ये ठेवलेले दूध बाळाला पाजण्यापूर्वी काही काळ सामान्य तापमानाला ठेवून ते साधारण तापमानाला आले की वाटी चमच्याने बाळाला पाजता येऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

अशा विविध प्रकारची महत्वाची माहिती देत असताना डॉ. अभिजीत म्हापणकर यांनी नोकरदार महिलांसमोर येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन काही मौल्यवान आणि फायदेशीर सूचना केल्या. पीपीटीच्या माध्यमातूनही सादरीकरण करत त्यांनी स्तनपान करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी टिप्स दिल्या. यावेळी फेसबुक लाईव्हवरुन व्याख्यानाचा अनुभव घेणाऱ्या महिलांमार्फत विविध शंका विचारण्यात आल्या, त्या सर्वांची समाधानकारक उत्तरे देत डॉ. अभिजीत म्हापणकर यांनी त्यांचे शंका निरसन केले.

जागतिक स्तनपान सप्ताह निमित महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने आणखी एका विशेष फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे ८ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. स्तनपानाचे महत्व या विषयावर, सायं. ४ वाजता डॉ. सुचेता किंजवडेकर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रम नवी मुंबई महापालिकेच्या प्ूूज्ेः//ैैै.िीमंददव्.म्दस्/ऱ्श्श्ण्दहत्ग्हा या फेसबुक पेजवर भेट देऊन विनामूल्य अनुभवता येऊ शकतो. अशाप्रकारे महिलांच्या या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉक्टरांच्या सेमिनारमध्ये डॉक्टरचा मृत्यू