तुर्भे येथे बेकायदेशीर वृक्षतोड; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

झाडे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तुर्भे : नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या वृक्षतोड होत असल्याची वारंवार चर्चा होत असतानाच तुर्भे येथील आय.सी.एल. शाळा जवळील बस थांब्याच्या लगतचे झाड खोडापासून तोडण्यात आले आहे. रणरणत्या उन्हामध्ये प्रवाशांना सावलीचे आधार ठरलेले सदर झाड बस थांब्यावरील जाहिराती दिसण्याकरिता तोडण्यात आले आहे का?, अशी चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी सदर झाड कोणी तोडले या विषयी माहिती नसल्याचे सांगितले. तर, आय.सी.एल. शाळा जवळील झाड कोणी तोडले याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका उपायुवत (उद्यान विभाग) दिलीप नेरकर यांनी दिली.

उद्यानांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. त्याचबरोबर नवी मुंबई शहरातील उद्याने हिरवीगार दिसावीत यासाठी उद्यानांचे संवर्धन करणे, झाडांची निगा राखणे आदी कामे केली जातात. १०० पेक्षा अधिक प्रभागांमध्ये असलेल्या उद्यान आणि मोकळ्या जागा, रस्त्यांवरील चौक, दुभाजक, रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या जागा याठिकाणी हिरवळ लावणे, गवत लावणे, शोभेची झाडे लावणे यासाठीही दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.

एखाद्या दुकानाच्या समोर असलेले झाड व्यवसायात अडथळा ठरत असेल आणि सदर झाड काढण्यास नियमानुसार अडचणी असतील, तर काही दुकानदार दुकानासमोरील झाडांवर विष प्रयोग करुन ते झाड मारतात. (कायमस्वरूपी सुकवतात) झाडाच्या मुळाशी रसायन टाकल्यानंतर झाडांना वाळवी लागून झाडे सुकून जातात. अशा घटना यापूर्वी वाशी, नेरुळ, सीबीडी, ऐरोली आदी परिसरामध्ये घडल्या आहेत. वाशी सेक्टर-१५ परिसरात सुकलेले वृक्ष आढळून येतात. त्यामुळे कायद्याला पळवाट काढून राजरोसपणे झाडे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

एकीकडे एकेक झाड वाचवण्यासाठी महापालिका जनतेच्या करातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करत आहे. परंतु, जनतेच्या पैशातून वाढवलेली झाडे तोडल्यावर मात्र त्याकडे महापालिका अधिकारी लक्ष देताना दिसत नाहीत. महापालिका अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे करदात्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच उद्यानांची योग्य प्रकारे निगा न राखणाऱ्या किंवा बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नवी मुंबई मधील नागरिक करीत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्तनपान सप्ताह निमित्त महापालिका मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन