सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

गणेशोत्सवापूर्वी गोवा हायवेवर एक मार्गिका होणार सुरु

पनवेल : ‘कोकण'च्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, राज्य शासन कटीबध्द आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ५ ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेल पर्यंत रस्त्याची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन सुरु होईल तर डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरु होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई-गोवा महामार्गाची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. पाऊस खूप पडत असल्यामुळे पावसामध्ये रस्त्याचे काम करता येत नाही. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून सिमेंट ट्रीटेड बेस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एका मार्गिकाचे काम पूर्ण होवून ती सुरु होईल. गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरु होणार असल्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल, असे ना. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

ना. रविंद्र चव्हाण यांनी नागोठणे येथील वाकण फाटा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन सदर काम  कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. सध्या पावसाळयात महामार्गाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन सुरु आहे. यामध्ये हलगर्जीपणा नको. तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी ना. चव्हाण यांच्या समवेत माजी आमदार धैर्यशील पाटील, ‘राष्ट्रीय महामार्ग'चे आरो अंशुमन श्रीवास्तव, मुख्य अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग जगदीश सुखदेवे तसेच इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विविध परवानग्यांची कार्यवाही पूर्ण...
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी असलेल्या वन विभाग, भूसंपादन, न्यायलयीन प्रक्रिया आणि अन्य बाबींच्या परवानग्यांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. येत्या डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ना. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे येथे बेकायदेशीर वृक्षतोड; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष