नवी मुंबई शहरात जागो-जागी श्रीमूर्ती विक्री केंद्र

बाजारात तयार श्रीगणेशमूर्ती ; स्थानिक मूर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत

वाशी : श्रीगणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच महिने आधीच मूर्तीकारांची लगबग सुरु होते. मात्र, बाजारात सध्या नवी मुंबई शहराबाहेरुन तयार मूर्ती विक्रीसाठी येत असल्याने येथील स्थानिक मूर्तीकारांचा ग्राहक वर्षागणिक रोडवत चालला आहे. त्यामुळे नवी मुंबई मधील स्थानिक मूर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक मोठा सण म्हणजे श्रीगणेशोत्सव. नवी मुंबई शहराला देखील या सणाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे येथील स्थानिक मूर्तीकार चार ते पाच महिने आधीच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागतात. नवी मुंबई शहर वसण्याआधी ग्रामपंचायत काळापासून येथील स्थानिक मूर्तीकार श्रीमूर्ती बनवत आले आहेत. ‘सिडको'ने नवी मुंबई शहराची निर्मिती केल्यानंतर या ठिकाणी हळूहळू इमारती उभ्या राहिल्यावर नवी मुंबई मधील मूर्तीकारांना जागेचा प्रश्न भेडसावू लागला. नवी मुंबई महापालिकेने भाडे तत्वावर जागा देण्यास सुरुवात केल्याने काही अंशी जागेचा प्रश्न देखील सुटु लागला असताना आता ग्राहकांची होणारी घट यामुळे स्थानिक मूर्तीकारांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. मागील काही वर्षांपासून बाजारात तयार मुर्ती विक्रीसाठी येत आहेत. या श्रीमूर्ती पेण  येथील कारखान्यात तयार होत असतात. या श्रीमूर्ती सहज उपलब्ध होत असल्याने नवी मुंबई शहरात आज जागो-जागी श्रीमूर्ती विक्री केंद्र उभी राहत आहेत. मात्र, तयार मूर्ती विक्री केंद्रामुळे स्थानिक मूर्तीकारांना नवीन ग्राहक मिळत नसल्याने त्यांची मदार फक्त जुन्याच ग्राहकांवर अवलंबून असून, त्यातही आता घट होत चालली आहे. परिणामी तयार श्रीमूर्ती मुळे नवी मुंबई शहरातील स्थानिक मूर्तीकारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने स्थानिक मूर्तीकार आज अखेरची घटका मोजत आहे.
---------------------------------
नवी मुंबई शहरात आज हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच स्थानिक श्रीगणेश मूर्तीकार शिल्लक राहिले असून, ते स्वतःचा  व्यवसाय जपत आहेत. मात्र, बाजारात पेण मधून येणाऱ्या तयार श्रीमूर्तीमुळे जागो-जागी मूर्ती विक्री केंद्र सुरु होतात. त्यामुळे नवी मुंबई मधील स्थानिक मूर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. - संतोष चौलकर, अध्यक्ष - श्रीगणेश मूर्तीकार संघटना, नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी