उद्‌वाहक बंद ; दिव्यांग,ज्येष्ठ नागरीकांना नाहक त्रास?

नेरुळ येथील सह निबंधक कार्यालयातील प्रकार

वाशी : नेरुळ येथील सह निबंधक कार्यालयात जाण्यासाठी असणारे उद्‌वाहक मागील काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरीकांना दोन मजले पायपीट करावी लागते. याचा सर्वाधिक त्रास जेष्ठ नागरीक, दिव्यांग तसेच व्याधीग्रस्त नागरिकांना होत आहे. त्यामुळे येथील उद्‌वाहक तात्काळ  दुरुस्त करावे, अशी मागणी होत आहे.

एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर त्याचे दस्त बनवले जाते. त्याची नियमानुसार शासकीय मुद्रांक शुल्क भरुन सह निबंधक कार्यालयात नोंदणी केली जाते. यासाठी खरेदी विक्री करणाऱ्या दोन्ही पक्षकारांना सह निबंधक कार्यालयात हजर राहावे लागते. त्यामुळे या कार्यालयात नेहमीच नागरीकांची वर्दळ असते. नवी मुंबई शहरातील ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि बेलापूर या पाच ठिकाणी सह निबंधक कार्यालय आहेत. त्यातील नेरुळ येथील कार्यालय एमटीएनएल इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या इमारतीची उद्‌वाहक बंद असल्याने दस्त नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरीकांना दोन माळे पायपीट करावी लागते. त्याचा नाहक त्रास जेष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच व्याधी असलेल्या नागरीकांना होत आहे. त्यामुळे या इमारतीची उद्‌वाहकाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी जेष्ठ नागरीक घनश्याम गुप्ता यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सह निबंधक कार्यालयाशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरात जागो-जागी श्रीमूर्ती विक्री केंद्र