रस्ते, पदपथ यांनी घेतला मोकळा श्वास

 ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण'मुळे एपीएमसी लगतचा परिसर चकाचक!

तुर्भे  वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट आणि तुर्भे परिसर या ठिकाणी स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे पथक येणार असल्याने दोन दिवसांपासून एपीएमसी परिसर फेरीवाला मुक्त आणि चकाचक झाल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्र शासनाने ‘स्वच्छ भारत उपक्रम' हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत देशात स्वच्छतेचे सर्वेक्षण करणारे पथक ठीक ठिकाणच्या शहरांना भेटी देत आहे. त्यानुसार मागील ८ दिवसांपासून सदर पथक नवी मुंबई शहरात दाखल झाले आहे. सदर पथक नवी मुंबई शहरातील विविध विभागांमध्ये फिरत आहे. सदर पथक काही ठिकाणी प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी देखील घेत आहे.

आशिया खंडातील सगळ्यात मोठी बाजारपेठ (एपीएमसी) मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आणि त्या लगतच्या परिसराची स्वच्छता सर्वेक्षण पथक पहाणी करणार आहे. तुर्भे आणि एपीएमसी भोवतालचा परिसर नेहमीच काही प्रमाणात अस्वच्छता आणि फेरीवाल्यांनी गजबजलेला असतो. परंतु, मागील दोन दिवसांपासून या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांना हुसकावले जात आहे. त्यामुळे रस्ते आणि पदपथ यांनी मोकळा श्वास घेतला आहे. तसेच  एपीएमसी परिसरात नेहमीच वाहणाऱ्या कचराकुंड्या देखील काही दिवसांपासून वेळेवरती उचलल्या जात आहेत. साफसफाई करणारे कर्मचारी देखील संध्याकाळपर्यंत रस्त्यावरती स्वच्छता करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. यामुळे सर्व नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत. याविषयी नागरिकांनी अधिक विचारणा केली असता, स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत एक पथक केंद्र शासनाकडून पाहणी करण्याकरिता नवी मुंबई शहरात दाखल झाले असल्याचे नागरिकांना सांगितले जात आहे. त्यामुळे रहिवाशांनी देखील कचरा कचराकुंडीतच टाकावा, असे आवाहनही वारंवार केले जात आहे.  ठिकठिकाणी पडलेले डेब्रिज देखील  एपीएमसी परिसरामधून हटवण्यात आले आहे. सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला तरी या परिसरात नेहमीच अशा प्रकारे स्वच्छता असते असे वाटायला हवे अशी परिस्थिती जणू काही मागील दोन दिवसांपासून संपूर्ण तुर्भे आणि एपीएमसी परिसरामध्ये दिसून येत आहे.

एपीएमसी फळ मार्केटच्या जावक दरवाज्यापासून ते भाजी मार्केटच्या जावक दरवाजापर्यंतच्या फेरीवाल्यांनी पदपथावरती आणि रस्त्यावरती ताबा मिळवला आहे. गोवंडी, मानखुर्द या परिसरामधीलच सदर सगळे फेरीवाले आहेत. सदर फेरीवाले दिवसभर व्यवसाय करुन रस्त्यावर आणि पदपथ यांवर कचरा टाकून निघून जातात. यामुळे या परिसराला नेहमीच बकालपणा दिसून येतो. स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक आल्याचा धसका घेऊन मागील दोन दिवसापासून येथून-तिथून एपीएमसी परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांना पिटाळण्याचे काम दिवसभर नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाकडून केले जात आहे. इतर वेळेस अतिक्रमणांची तात्पुरती गाडी आली की फेरीवाले पळतात आणि गाडी गेली ती पुन्हा फेरीवाले पदपथ आणि रस्ते यावर ताबा मिळत असतात. त्याचबरोबर माथाडी भवन पासून ते नवी मुंबई मर्चंट चेंबर, जलाराम मार्केट या परिसरातील दुकानधारक यांचे साहित्य नेहमी मार्जिनल स्पेसच्या पुढे अगदी फुटपाथवर असते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांना देखील दम देण्यात आला असून, त्यांनीही त्यांचे साहित्य दुकानात घेतलेले आहे. त्यामुळे मार्जिनल स्पेसची जागा तसेच पदपथ यांनी देखील मोकळा श्वास घेतलेला असल्याचे चित्र दिसत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चाईल्ड लाईन सेवा महिला-बाल विकास विभागांमार्फत राबविण्याचा निर्णय