सभापती निवडीचा प्रस्ताव मंजूर

न्यायालयाच्या आदेशाने एपीएमसी संचालक मंडळाची बैठक संपन्न

वाशी : मागील ८ महिन्यांपासून रखडलेली वाशी मधील ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ'ची बैठक न्यायालयाच्या आदेशाने ३ ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत अत्यावश्यक सेवांसह सभापतींची निवड करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव राज्य पणन खात्याकडे पाठवण्यात आला असून, आता पणन संचालक यावर काय निर्णय घेतात यावर सभापतींचे भवितव्य अवलंबून आहे.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मधील ७ सदस्यांना विविध करणांस्तव राज्य पणन संचालकांनी अपात्र ठरवले होते. त्यामुळे मागील दहा महिन्यांपासून एपीएमसी संचालक मंडळाची बैठक न झाल्याने अनेक धोरणात्मक निर्णयांना खिळ बसली आहे. संचालक अपात्रेला न्यायालयाने स्थगिती दिल्याने एपीएमसी संचालक मंडळ सभेसाठी आवश्यक सदस्यांची गणपूर्ती पुर्ण झाली आहे. त्यामुळे ३० जून २०२३ रोजी बाजार समिती संचालक मंडळाची बैठक घेण्याचे परिपत्रक बाजार समिती सचिवांनी काढले होते. यात प्रथमतः अत्यावश्यक कामांचे तसेच कर्मचारी भत्ता, सर्व्हिस रस्ता डांबरीकरण, कार्यालये, गाळे कॅन्टीन भाडेपट्टा करार, मालमत्ता विभाग, प्रशासन, तातडीचे येणारे विषय इत्यादी कामांच्या मंजुरीचे विषय पटलावर घेण्यात येणार होते. मात्र, एपीएमसी संचालक मंडळातील सभापती आणि उपसभापती यांच्या राजीनाम्याचे कारण पुढे करत ३० जून २०२३ रोजीची एपीएमसी संचालक मंडळाची सभा पणन संचालकांनी रद्द केली होती. या विरोधात एपीएमसी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. एपीएमसी संचालकांच्या आपत्रेला आधीच स्थगिती असल्याने बैठकीसाठी लागणारी गणपूर्ती पूर्ण होती. त्यामुळे सदर बैठक घेण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार ३ ऑगस्ट रोजी एपीएमसी संचालक मंडळाची नियोजित बैठक पार पडली. या सभेत अत्यावश्यक सेवेतील काही रखडलेल्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक घेऊन एपीएमसी सभापतींची निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव पणन खात्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पणन संचालक यावर काय निर्णय घेतील यावर ‘एपीएमसी'च्या नवीन सभापतींचे भवितव्य अवलंबून आहे.

 न्यायालयाच्या आदेशाने ३ ऑगस्ट रोजी एपीएमसी संचालक मंडळाची नियोजित बैठक पार पडली. या बैठकीत काही अत्यावश्यक विषयांना मंजुरी देण्यात आली असून, बाकी विषय पुढील बैठकीत घेतले जाणार आहेत. तर एपीएमसी सभापतींची निवड करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करुन पणन खात्याकडे पाठवण्यात आला आहे. - प्रकाश अष्टेकर, उप सचिव - एपीएमसी.

‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'वर सध्या काळजी वाहू सभापती आहेत. त्यामुळे एपीएमसी सभापतींची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करुन, सदर प्रस्ताव राज्य पणन खात्याकडे पाठवण्यात आला आहे. - अशोकराव डक, काळजीवाहू सभापती - एपीएमसी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्ते, पदपथ यांनी घेतला मोकळा श्वास