नैना विरोधात हजारो शेतकऱ्यांच्या विधिमंडळावर मोर्चा

मोर्चामध्ये ‘नैना हटाव, शेतकरी बचाव'च्या घोषणा

नवी मुंबईः ‘सिडको'च्या नैना क्षेत्राविरोधात पनवेल मधून ‘शेकाप'चे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने विधिमंडळावर निघाला. या मोर्चामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांकडून नैना हटाव, शेतकरी बचाव अशा घोषणा देण्यात आल्या.

३ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास पनवेल मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला ‘नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती'चे पदाधिकारी शेतकरी आणि ‘महाविकास आघाडी'चे नेत्यांनी अभिवादन आणि पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन हजाराेंच्या संख्येने शेतकऱ्यांनी मोर्चाद्वारे विधिमंडळाच्या दिशेने पायी कुच केली. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ यांनी नैना प्रकल्प आम्हाला नकोच; आमच्या जमिनी फुकट घेणाऱ्या ‘नैना'ला आमचा विरोध आहे यासह इतर घोषणा दिल्या. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता.
पनवेल, उरण परिसरात येऊ घातलेल्या अन्यायकारक नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठविण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पनवेल ते आझाद मैदान अशी पायी दिंडी (लाँग मार्च) काढण्यात आली. या मोर्चात नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती, शेकाप, महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष, नैना विरोधी इतर सर्व सामाजिक संघटना आणि माठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले आहे. या मोर्चामध्ये माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह माजी आमदार पंडीत पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शिवसेना नेते बबन पाटील, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, सभापती नारायण घरत, काँग्रेस नेते आर. सी. घरत, शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर यांच्यासह इतर पक्षीय नेते, माजी नगरसेवक देखील सहभागी झाले होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खाडीवरची माडी कादंबरीवरील चर्चासत्रात मान्यवर सहभागी होणार