नवी मुंबईत डोळ्यांच्या साथीचा शिरकाव

नवी मुंबई शहरात डोळे साथ मध्ये वाढ

वाशी : मुंबई शहरात डोळ्यांची साथ आल्यानंतर आता या आजाराने नवी मुंबई शहरात देखील शिरकाव केला आहे. नवी मुंबई शहरात डोळ्याची साथ वेगाने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका रुग्णालयात रोज २० ते २५ रुग्ण उपचारासाठी येत असून, तितकीच संख्या खाजगी उपचार घेणाऱ्यांची आहे.त्यामुळे नागरिकांनी डोळ्यांच्या बाबतीत आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरात कंजंक्टिवाईटीस नामक डोळयांचा आजार वाढताना दिसत आहे. कंजंक्टिवाईटीस विषांणूंमुळे, रोगजीवाणूंमुळे, परागकण किंवा धूर किंवा धुळीसारखे ॲलर्जीकरणांमुळे कंजंक्टिवाईटीस आजार होतो. कंजंक्टिवाईटीस आजार पावसाळ्यात पसरतो आणि लहान मुलांमध्ये, प्रौढांमध्ये तो संसर्गजन्य असतो. डोळयाचा विषाणूजन्य संसर्ग मुख्यत्वे ॲडिनो वायरस मुळे होतो. सध्या महापालिका रुग्णालयात कंजंक्टिवाईटीस रुग्ण नेहमीपेक्षा जास्त प्रणातात आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई शहरातही मध्येच कडक ऊन, मध्येच पावसाळा, ढगाळ वातावरण असे उष्ण-दमट हवामान आहे.  हवेमध्ये दमटपणा वाढल्यावर संसर्गजन्य रोग जंतूंना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे संसर्गजन्य आजारात वाढ  होत आहे.  या दिवसांत इतर आजारांसोबत डोळ्याचे विकारही जडत आहेत. श्लेष्मल निघणारे, लाल आणि सुजलेले डोळे, पाणावलेले डोळे, बोचरी संवेदना, खाज, जळजळ, दाह, पापण्या किंवा पापण्यांवरच्या केसांवर रखरखीत थर जमा होणे, आदी लक्षणे या आजारात आढळतात. डोळे येणे, संसर्गजन्य आजार असून, दुषित रुग्णांपासुन त्यांच्या सहवासातील व्यक्तीमध्ये ऐकमेकांच्या वापरात येणाऱ्या दुषित झालेल्या वस्तु जसे रुमाल, बेडशीट, चादर, उशी इत्यादी व्दारे संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी डोळ्यांचा आजार पसरु नये, याकरिता आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका मार्फत करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नैना विरोधात हजारो शेतकऱ्यांच्या विधिमंडळावर मोर्चा