गृहिणींचे किचन बजेट पुरते कोलमडले

किरकोळ बाजारात भाजी दर ‘शतक'पार

वाशी : क्रिकेट स्पर्धेत सर्वच खेळाडूंमध्ये शतक मारण्यासाठी स्पर्धा लागलेली असत. मात्र, मागील काही दिवसांपासून बाजारात देखील क्रिकेट प्रमाणे भाज्यांच्या दरांची शतकी स्पर्धा लागली आहे. त्यामुळे बहुतांश भाज्या या शंभरी पार गेल्याने शाकाहार देखील महाग झाल्याने गृहिणींचे किचन बजेट पुरते कोलमडले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच बाजारात येणाऱ्या भाज्या पावसात भिजत असल्याने त्या खराब देखील होत आहेत. परिणामी मागणी प्रमाणे भाज्या उपलब्ध होत नसल्याने भाज्यांचे दर चढेच आहेत.

बाजारात मागील एक ते दीड  महिन्यांपासून टोमॅटो १०० रुपयांच्या खाली उतरण्याचे नाव घेत नाही. तर इतर भाज्यांच्या किंमतीत  देखील किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली असून, बहुतांश भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. सध्या श्रावण अधिक मास सुरु आहे. पुढील काही दिवसात प्रत्यक्षात श्रावण महिना सुरु होणार असुन, त्यानंतर गणेशोत्सव सण येणार आहे. या दिवसात मोठ्या प्रमाणात शाकाहार केला जातो. त्यामुळे भाज्यांच्या दरांची आताच चढे परिस्थिती आहे तर मुख्य श्रावणात काय?, अशा विवंचनेत गृहिणी पडल्या आहेत. दुसरीकडे येत्या काळात भाज्यांची आवक न वाढल्यास किमती आणखी वाढणार असल्याचा अंदाज वाशी येथील एपीएमसी भाजीपाला बाजार मधील व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

रोजच्या जेवणात लागणाऱ्या भाज्यांचे दर सध्या कमालीचे वाढले असल्याने गृहिणींचे किचन बजेट पुरते कोलमडले आहे. अजून मुख्य श्रावण महिना आणि गणेशोत्सव सण येणार आहे. त्यामुळे भाजी दरांची परिस्थिती अशीच राहिली तर खर्च भागवायचा कसा?, असा प्रश्न सतावत आहे. - सायली झुजुम, गृहिणी - जुईनगर, नवी मुंबई.
किरकोळ बाजारात भाजी दर
वाटाणा - २०० ते २२० रुपये प्रतिकिलो
आले (अद्रक) - २०० ते २२० रुपये प्रतिकिलो
टोमॅटो - १६० ते १८० रुपये प्रतिकिलो
फरसबी - ११० ते १२० रुपये प्रतिकिलो
गाजर - १०० ते १२० रुपये प्रतिकिलो
तोंडली - १०० ते ११० रुपये प्रतिकिलो
हिरवी मिरची - १०० ते १२० रुपये प्रतिकिलो
ढोबळी मिरची - १०० ते १२० रुपये प्रतिकिलो
गवार - १०० ते ११० रुपये प्रतिकिलो 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत डोळ्यांच्या साथीचा शिरकाव