‘मनसे'चा दणका

‘सिडको'च्या घरांचा ताबा मिळण्यापासून ३,८०० मराठी कुटुंब वंचित

नवी मुंबई : दीड वर्षांपूर्वी तळोजा येथील ‘सिडको'च्या घरांसाठी लॉटरी लागलेले आणि घरांचे हप्ते भरलेले ३,८०० मराठी कुटुंब ताबा न मिळाल्यामुळे मनसे सोबत ‘सिडको' भवनवर धडकले. यावेळी ‘मनसे'चे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि सोडतधारकांचे आक्रमक रुप पाहून ‘सिडको'चे मुख्य अभियंता राजेंद्र धयाटकर यांनी येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत सदर सोडतधारकांना घरांचा ताबा देण्याचे लेखी आश्वासन दिले.

११ सप्टेंबर २०१९ रोजी सिडको मार्फत तळोजा, सेक्टर-३४/३६ येथील अंदाजे ८०००  सदनिकांची सिडको महागृहनिर्माण योजने अंतर्गत जाहिरातीची सोडत काढून घरांची विक्री करण्यात आली. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे विजेत्या सोडतधारकांना ३१ मे २०२२ रोजी घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. शिवाय गृहसंकुल पूर्णपणे तयार झाले असून देखील आजतागायत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील सोडतधारकांना सदर घराचा ताबा मिळालेला नाही. याबाबत गेल्या वर्षी ‘सिडको'कडे विचारणा केली असता सोडतधारकांना ती तारीख मार्च २०२३ अशी करण्यात आल्याचे सांगितले. पुनश्च सिडको प्रशासनाने २९ मे २०२३  रोजी परिपत्रक काढून २४ जुले २०२३ रोजी ताबा देण्याचे जाहीर केले. त्यांनतर आता पुन्हा ‘सिडको'च्या २४ जुलै २०२३ रोजीच्या पत्रकानुसार सदर ताबा मिळण्याची तारीख २९ मे २०२४ देण्यात आली आहे. ‘सिडको'च्या या ‘तारीख पे तारीख'  धोरणांमुळे लॉटरी विजेत्या सोडतधारकांवर आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

सिडको जाहिरातातील हजारो विजेत्या सोडतधारकांनी ‘सिडको'ने आखून दिलेल्या आर्थिक देयक वेळापत्रकानुसार रक्कम पूर्ण  अदा केली आहे. सद्य परिस्थितीत अत्यल्प आणि अल्प गटातील सोडतधारकांचे त्यांनी घेतलेल्या गृहकर्जाचे हप्तेदेखील सुरु झाले आहेत. त्यामुळे घरभाडे भरणे, घर चालविणे व गृहकर्ज भरणे अशा  तिहेरी संकटात सदर विजेते सोडतधारक सापडले आहेत. त्यामुळे ‘सिडको'ने सदर सोडतधारकांना तात्काळ त्यांच्या घरांचा ताबा देत त्यांची आर्थिक कचाट्यातून सुटका करावी. मुळातच ‘सिडको'ने सर्व आर्थिक बाबी पूर्ण झाल्यानंतर जाहीर केलेल्या तारखेला ताबा देणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता ताबा देण्यास चालढकल केल्यामुळे विजेत्या सोडतधारकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केला आहे. ‘सिडको'ने एकतर सोडतधारकांना त्वरित ताबा द्यावा किंवा ताबा देण्यास उशीर झालेल्या कालावधीची आर्थिक नुकसान भरपाई त्यांना द्यावी, अशी आग्रही मागणी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने आणि सोडतधारकांनी ‘सिडको'चे महाव्यवस्थापक फैय्याज खान आणि मुख्य अभियंता राजेंद्र धयाटकर यांच्याकडे केली.

दरम्यान, ‘सिडको'चे महाव्यवस्थापक फैय्याज खान आणि मुख्य अभियंता राजेंद्र धयाटकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळाली की, गृहसंकुल बांधून तयार आहे. परंतु, रस्ता, गटार, पाणी व्यवस्था करणे बाकी आहे. यावेळी ‘मनसे'च्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्य अभियंता राजेंद्र धयाटकर यांनी सर्व प्रलंबित कामे येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे लेखी आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले.

याप्रसंगी ‘मनसे'चे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह शिष्टमंडळात नवी मुंबई शहर सचिव सचिन कदम, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, मनसे प्रतिनिधी अमर पाटील, डॉ. नितीन दिघे तसेच मोठ्या संख्येने सिडको सोडतधारक बांधव आणि महिला भगिनी उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गृहिणींचे किचन बजेट पुरते कोलमडले