‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य-समाज' या विषयावर व्याख्यान संपन्न

अण्णाभाऊ साठे तत्वशील, विचारशील, कृतीशील साहित्यरत्न डॉ. सोमनाथ कदम

नवी मुंबई : अण्णाभाऊंनी सामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करणारे जीवनस्पर्शी साहित्य लिहिले. त्यामुळे अण्णा भाऊंचे मानवतावादी साहित्य जागतिक दर्जाचे ठरले आणि ते ‘साहित्यरत्न' या उपाधीने सन्मानित झाले. समाजाला विचारप्रणव बनवण्याची भूमिका घेऊन लिहिणारे साहित्यिक अशी अण्णाभाऊंची खरी ओळख आहे. श्रमिकांचे, स्त्रियांचे, शोषितांचे जगणे अण्णाभाऊंनी साहित्यातून साकारले. आपल्या साहित्यकृतीतून महामानवांच्या चळवळीचा वारसा अण्णाभाऊंनी पुढे नेला, असे ववतव्य महाराष्ट्र शासनाच्या ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समितीे'चे सदस्य तथा अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य-तत्वज्ञान अशा अनेक पुस्तकांचे लेखक, वक्ते डॉ. सोमनाथ कदम यांनी मांडले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘विचारवेध' या व्याख्यान शृंखलेंतर्गत आयोजित ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य-समाज' या विषयावर डॉ. सोमनाथ कदम यांनी अण्णाभाऊंच्या समाजस्पर्शी सर्वव्यापी साहित्याचा विस्तृत पट खुला केला. डॉ. कदम यांनी कथा, कादंबऱ्या, शाहिरी कवने, लोकगीते, लोकनाट्य अशा वैविध्यपूर्ण साहित्यकृतींतून माणसाचे माणूसपण जागवणाऱ्या अण्णाभाऊंच्या साहित्याचा विविध उदाहरणे देत सविस्तर आढावा घेतला.

वंचितांच्या चळवळीला बळ देणारे सुधारणावादी साहित्यिक असणारे अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून दैववादाला, अंधश्रध्देला नकार देतात. अन्यायाने आणि गुलामगिरीने पिडलेल्या गावगाड्यातील सामान्य माणसाच्या मनामनात स्वाभिमान पेरणारे अण्णाभाऊ संविधानिक मूल्याचा आग्रह धरणारे आणि आपल्या लेखणीचा चळवळीचे हत्यार म्हणून वापर करणारे साहित्यिक, कलावंत आणि कार्यकर्ते होते. अण्णाभाऊंच्या ‘सोन्याचा मणी, विठू महार, कोंबडीचोर' अशा विविध कथांची उदाहरणे देत डॉ. सोमनाथ कदम यांनी त्यांच्या लेखनातील सर्वात्मक विचार सुटे सुटे करीत सहजपणे उलगडून दाखविले. तसेच ‘मुंबई कोणाची?' असे लोकगीत, ‘माझी मैना गावाकडे राहिली' सारखी छक्कड, ‘मुंबईची लावणी', ‘शिवारी चला' अशा विविध गीतांमधील गर्भित अर्थही डॉ. कदम यांनी सोपे करुन सांगितले.
     

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची ओळख आता सर्वत्र ‘ज्ञानस्मारक' म्हणून होत असल्याबद्दल आनंद आहे. विविध मान्यवरांच्या व्याख्यानांतून महामानवांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्याचा प्रयत्न ‘विचारवेध' या व्याख्यानशृंखलेंतर्गत महापालिका करीत आहे. आपल्या अजरामर साहित्यकृततून आणि कार्यातून समाजाला नवी दिशा देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. व्याख्यानांना श्रोत्यांचा मिळणारा उदंड प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

क्लस्टर योजना; महापालिका आणि महाप्रीत यांची करारावर स्वाक्षरी