क्लस्टर योजना; महापालिका आणि महाप्रीत यांची करारावर स्वाक्षरी

पहिल्या टप्प्यातील काम किसननगर मध्ये सुरु

ठाणे : आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समूह विकास योजना (क्लस्टर) ठाणे शहरात मूर्त रुप घेत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम किसननगर मध्ये सुरु झाले आहे. त्याच टप्प्यातील टेकडी बंगला, हाजुरी आणि किसननगर क्लस्टरचा काही भाग विकसित करण्यासाठी ठाणे महापालिकेने २ ऑगस्ट रोजी महात्मा फुले नुतनीय उर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रीत) या शासकीय संस्थेशी करार केला.

ठाणे महापालिका आणि महाप्रीत या दोन संस्थांमधील सामान्य निर्णायक करारावर (उाहाीीत् ग्हिग्ूग्न ींुीाासहू) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ‘महाप्रीत'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी २ ऑगस्ट रोजी सह्या केल्या. याप्रसंगी, महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगररचना उपसंचालक प्रदीप गोहील, कार्यकारी अभियंता महेश रावळ, ‘महाप्रीत'चे विजयकुमार पाटील, पुरुषोत्तम जाधव, प्रशांत गेडाम, रवींद्र चव्हाण, सुभाष नागे, सुनील पोटे तसेच ठाणे महापालिकेचे तांत्रिक सल्लागार संजय देशमुख आणि त्यांचे सहाय्यक सागर पवार उपस्थित होते.

अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्या नियमानुसार ठाणे महापालिकेकडून आतापर्यंत एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे अधिसूचित करण्यात आलेले आहेत. अधिसूचित एकूण ४५ क्लस्टरपैकी ६ क्लस्टरबाबतची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात, कोपरी, राबोडी, किसननगर, लोकमान्यनगर, हाजुरी, टेकडी बंगला यांचा समावेश आहे.
ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित, संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० हेक्टर एवढे आहे. या ४५ आराखड्यापैंकी अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुर्नरुत्थान आराखडा क्रमांक-१२ मधील नागरी पुर्नरुत्थान योजना १ आणि २ या कामाचा प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जून रोजी शुभारंभ झाला. या कामाची सुरुवात अंतिम भूखंड क्रमांक-१८६/१८७ या वरील ७७५३ चौ. मी. क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक २२लगतचा भूखंड क्रमांक एफ - ३ या ठिकाणी १९२७५ चौ. मी. एवढया जागेवर करण्यात आली. नागरी पुनरुत्थान १, २ या योजनेची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होत आहे.

अनेक वर्षे नागरिक प्रतीक्षा करीत असलेल्या क्लस्टर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाल्याने अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये :
अनधिकृत इमारतीसह वसाहतीचा टाऊनशीप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प, मोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित आणि सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य ३२३ चौरस फूट मालकी हक्काचे घर, प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम  सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा, प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्यकेंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था, पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त, दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल आणि जलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा, सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदि नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे. प्रख्यात वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या डिझाईननुसार टाऊनशीपची उभारणी केली जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मनसे'चा दणका