शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
खारघर मधील रस्त्यांवर फुटभर खोल खड्डे
खारघर मधील वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर पावसामुळे फुटभर खोल खड्डे
खारघर : खारघर वसाहत मधील रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी पनवेल महापालिकेने नऊ कोटी रुपयांचे कंत्राट एका एजन्सीला दिले आहे. असे असताना देखील वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर पावसामुळे फुटभर खोल खड्डे पडले आहे. मात्र, रस्ते दुरुस्तीसाठी सदर एजन्सीकडून केवळ चार कामगार काम करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पनवेल महापालिकेत खारघर नोड सर्वात मोठी वसाहत आहे. वसाहतीत एकूण चाळीस सेक्टर्स आहे. विशेष म्हणजे हिरानंदानी कडून तळोजा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील हिरानंदानी प्रवेशद्वार, बँक ऑफ इंडिया सिग्नल, अग्निशमन केंद्र आणि प्रमाण हॉटेल समोरील गतिरोधक, ग्राम विकास भवन, सेंट्रल पार्क गुरुद्वारा समोरील रस्ता तसेच तळोजा मध्यवर्ती कारागृह कडून शीघ्र कृती दल कडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या पांडव मार्ग, मेट्रो पुलाखाली फुटभर खोल खड्डे पडले आहे. पावसाळ्यात खड्ड्यामध्ये तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्यामुळे त्यामध्ये पडून दुचाकी चालकांच्या किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. या शिवाय खारघर पोलीस ठाणे कडून खारघर गांव आणि घरकुल कडे जाणाऱ्या तसेच शिल्प चौक कडून सेंट मेरी स्कुल आणि जलवायू कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ९ कोटी रुपये खर्च करुन खारघर मधील रस्ते देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी श्री कृष्ण कन्ट्रक्शन एजन्सीची नेमणूक केली आहे. खारघर मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. मात्र, रस्ते दुरुस्तीसाठी सदर एजन्सीचे केवळ चार कामगार काम करीत असल्यामुळे खड्डे दुरुस्तीचे काम कसे होणार? असा प्रश्न खारघरवासियांना पडला आहे. एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरची वाटचाल खड्ड्याकडे सुरु असल्याचे दिसून येते. या विषयी महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.
खारघर विभागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या विषयी महापालिकेकडे पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष केले जात आहे. बँक ऑफ इंडिया आणि हिरानंदानी चौकात मोठ्या प्रमाणात खोल खड्डे पडले आहे. सदर रस्ता रहदारीचा असल्यामुळे महापालिकेने रात्रीच्या वेळी खड्डे भरणा करणे आवश्यक आहे.
- ॲड. नरेश ठाकूर, माजी नगरसेवक-पनवेल महापालिका.
पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्डे दुरुस्तीकरिता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन खड्डे दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या विषयी महापालिका अधिकाऱ्यांना सांगितल्यास बघू ,पाहू असे मोघम उत्तर दिले जाते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - अमर उपाध्याय, पदाधिकारी-भाजप, खारघर.
खारघर मध्ये ‘भाजपा'चे बारा माजी नगरसेवक आहेत. खारघरची वाटचाल खड्यांकडे सुरु असूनही कोणीही चकार शब्द काढताना दिसत नाही. दरम्यान, मागील वर्षी रस्त्यावर पडलेल्या खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेने काही ठिकाणी काम केले होते. तर ‘सिडको'ने एक कोटी रुपये खर्च करुन खड्डे दुरुस्तीसाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती. सदर एजन्सीने एकाच वेळी सहा ते सात ठिकाणी कामगार लावून रस्ते दुरुस्तीचे काम केले होते. मात्र, पालिकेकडून नऊ कोटी रुपये खर्च करुन नऊ कामगारांची देखील नेमणूक केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.