जेएनपीए बंदर प्रशासनाने न्हावा शेवा पोलीस ठाण्याची इमारत उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा 

 

जेएनपीए बंदर प्रशासनाने न्हावा शेवा पोलीस ठाण्याची अत्याधुनिक, सुविधा युक्त  इमारत उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा

उरण  :  जेएनपीए बंदर परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री अपरात्री ड्युटी बजावणाऱ्या न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या इमारतीला सध्या पावसाने वेढले आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्गाला काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.तरी जेएनपीए बंदर प्रशासनाने न्हावा शेवा पोलीस ठाण्याची अत्याधुनिक, सुविधा युक्त  इमारत उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

देश- परदेशात मालाची आयात - निर्यात करुन देशाला आर्थिक चलन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने उरण तालुक्यात जेएनपीए बंदराची उभारणी केली आहे. सदर बंदर परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीमुंबई पोलीस आयुक्तालयांनी बंदराजवळ नव्या न्हावा शेवा पोलीस ठाण्याची उभारणी केली आहे.परंतु बंदर परिसरात सततच्या विकासातील दगड मातीच्या भरावामुळे या पोलीस ठाण्याची इमारत हळूहळू चिखलात रुतू लागली असून परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे.सध्या तर इमारतीच्या छताला गळती लागली असल्याने पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यात पावसाच्या पाण्यानी इमारतीत प्रवेश केल्याने महत्त्वाचे साहित्य,सामान, मुद्दे माल यांचे नुकसान ही होत आहे. तरी जेएनपीए बंदर प्रशासनाने न्हावा शेवा पोलीस ठाण्याची अत्याधुनिक सुविधा युक्त इमारत उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

जेएनपीए बंदर प्रशासनाने सुमारे १० वर्षांपूर्वी सोनारी- करळ ग्रामपंचायत हद्दीत अत्याधुनिक, सुविधा युक्त पोलीस ठाण्याची इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.परंतु बंदर प्रशासनाच्या ढिसाळ, नियोजन शुन्य कारभारामुळे आजही सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीच काम रेंगाळत पडले आहे.तरी न्हावा शेवा पोलीस ठाण्याची नव्याने इमारत उभी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी आम्हा ग्रामस्थांची सातत्याने मागणी आहे - माजी सरपंच महेश कडू

 जेएनपीए बंदर प्रशासनाने सोनारी - करळ ग्रामपंचायत हद्दीत सुविधा युक्त पोलीस ठाण्याची इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.परंतु तांत्रिक अडचणी असल्याने प्रस्ताव पडून राहिला आहे. सदर अडचणी दूर करुन लवकरच लवकर न्हावा शेवा पोलीस ठाण्याची इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- सौ.मनिषा जाधव- वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जेएनपीए बंदर

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

धुतूम गावातील भुयारी रस्ता बनला धोकादायक