शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘सिडको'तर्फे लिपीक टंकलेखक, लेखा लिपीक, सहा. अभियंता (स्थापत्य) पदांकरिता अनुभवाची अट रद्द
गेल्या १२ वर्षांपासून सिडको प्रशासनकडून ‘असोसिएशन'च्या मागणीकडे दुर्लक्ष -बी. आर. तांडेल
नवी मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सिडको संचालक मंडळाने, सिडको महामंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या लिपीक टंकलेखक, लेखा लिपीक, सहा. अभियंता (स्थापत्य), आदि पदांकरिता अनुभवाची अट रद्द करण्याचा निर्णय घ्ोतला आहे. याबाबतचे पत्र ‘सिडको'च्या प्रभारी व्यवस्थापक (कार्मिक) यांच्या वतीने ५ जुलै रोजी ‘सिडको ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'ला पत्राद्वारे कळविण्यात आली आहे.
‘सिडको'मध्ये होऊ घातलेल्या भरती प्रक्रियेमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त, नैना प्रकल्पग्रस्त तसेच ‘सिडको'कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी अनुभवाची अट रद्द अथवा शिथील करावी, अशी मागणी ‘सिडको ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'च्या वतीने ९ मार्च २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सिडको ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'ने केलेल्या मागणीनुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश ‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. त्यानुसार सिडको व्यवस्थापनाने ‘सिडको संचालक मंडळ'मधील मंजूर ठरावानुसार महामंडळामध्ये लिपीक टंकलेखक, लेखा लिपीक, सहा. अभियंता (स्थापत्य), आदि पदांकरिता असलेली अनुभवाची अट रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत ‘सिडको'च्या प्रभारी व्यवस्थापक (कार्मिक) यांच्यातर्फे ‘सिडको ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'ला पत्र देण्यात असल्याची माहिती ‘असोसिएशन'चे अध्यक्ष बी. आर. तांडेल आणि सेेक्रेटरी रमेश मोकल यांनी दिली.
गेल्या बारा वर्षापासून ‘सिडको ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन' प्रकल्पग्रस्त नोकर भरती बरोबर इतरही ओबीसी प्रवर्गाच्या न्याय हक्कासाठी काम करत आहेत. त्याचबरोबर ज्या ज्या वेळी विविध पदांसाठी नोकर भरती केली जाते त्या त्या वेळी प्रकल्पग्रस्त पाल्यांची पदे भरली पाहिजेत, असे ‘असोसिएशन'तर्फे सिडको प्रशासनाला वेळोवेळी विनंती करण्यात येत होती. मात्र, सिडको प्रशासन सदर मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करत आली. तसेच पदभरती करताना प्रकल्पग्रस्तांना अनुभवाची अट शिथील करण्यात यावी, याबाबतही ‘सिडको'च्या कार्मिक विभागाकडे यापूर्वीही पत्रव्यवहार केला होता. पण, त्यांनीही मागणीकडे कानाडोळा केला. अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदर विषया संदर्भात पत्रव्यवहार केला असता मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी सिडको प्रशासनाला आदेश देऊन प्रकल्पग्रस्त पाल्यांना नोकर भरतीत अनुभवाची अट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, असे ‘सिडको ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष बी. आर. तांडेल यांनी सांगितले.