मोरबे धरण कुठल्याही क्षणी १०० % भरण्याची शक्यता

नवी मुंबई शहरातील नागरिकांना प्रतिदिन ४७० एमएलडी पाणी पुरवठा

वाशी : मागील १०-१२ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे ‘मोरबे धरण' पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचाल करीत आहे. आतापर्यंत ८६ % मोरबे धरण भरले असून, पाण्याने ८६ मीटर पातळी गाठली आहे. मोरबे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते. धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस पाहता मोरबे धरण कुठल्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे.

स्वतःचे मालकीचे धरण असल्याने जल संपन्न शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. मोरबे धरणातून नवी मुंबई शहरातील नागरिकांना प्रतिदिन ४७० एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच नवी मुंबई शहरासह कामोठे आणि मोरबे परिसरातील ७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मोरबे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. मागील दहा -बारा दिवसांपासून माथेरान आणि मोरबे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.

याआधी २०१८ मध्ये २५ जुलै रोजी, २०१९ मध्ये ४ ऑगस्ट रोजी तर २०२१ मध्ये २८ सप्टेंबर रोजी मोरबे धरण पूर्ण  भरले होते. मागील वर्षी १ मीटर पातळी कमी पडल्याने मोरबे धरण भरले नाही. यंदा मात्र पावसाचा जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा होणारे मोरबे धरण १०० % भरण्याकडे वाटचाल करीत आहे.२ जुलै रोजी  धरणाची पातळी ७० मीटर होती ती आता ८६ मीटर पर्यंत पोहोचली आहे. मोरबे धरण पूर्ण भरण्यास अजून दोन मीटरची पातळी आवश्यक आहे. त्यामुळे माथेरान मध्ये पडत असलेला पाऊस पाहता मोरबे धरण कुठल्याही क्षणी भरणार असून, मोरबे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.

मोरबे धरण पूर्ण भरण्यास अजून दोन ते सव्वादोन मीटर पाणी पातळी लागेल. धरण क्षेत्रात पावसाचा जोर पाहता मोरबे धरणातील पाणी पातळी लवकरच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८८ मीटर पाणी पातळी गाठताच मोरबे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल. - मनोज पाटील, अतिरिक्त शहर अभियंता (पाणी पुरवठा) - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत कोकण विभागीय कार्यशाळा संपन्न