नागरिकांच्या आग्रहास्तव महापालिका मालमत्ता कर पुर्न निरीक्षण मोहिमेस मुदतवाढ

मालमत्ता धारकांना कलम १२९ अ अन्वये सवलत

पनवेल : पनवेल महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत २४ जुलै ते २८ जुलै या कालावधीत पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १०ः३० ते दुपारी १ः३० या वेळेत कर निर्धारण दुरुस्ती मोहीम राबविण्यात आली. नागरिकांचा या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. याच  काळात पाऊसाचे प्रमाण जास्त असल्याने अधिकतर नागरिकांना या मोहिमेचा लाभ घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागरिकांच्या आग्रहास्तव या मोहिमेमध्ये मुदत वाढ करण्यात आली असून, ३१ जुलै पासून ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत कर निर्धारण दुरुस्ती मोहिम सुरु असणार आहे.  नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

दिलेल्या मुदतीत हरकत न घेतलेल्या मालमत्ता धारकांना नैसर्गिक न्याय मिळावा या तत्वाने आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ अंतर्गत कराधान नियमानुसार कर आकारणीत दुरुस्ती, फेरफार करण्याची तरतुद असल्याने मालमत्ता धारकांना हरकत अर्ज करण्यासाठीची आणखी एक संधी कर निर्धारण दुरुस्ती या मोहिमेच्या माध्यमातून महापालिका तर्फे देण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, पहिल्या चार दिवसात सुमारे ५११ तर २८ जुलै रोजी एका दिवसात सुमारे ६४८ नागरिकांनी आपल्या बिलामध्ये दुरुस्ती करुन घेतली. महापालिका उपायुक्त गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारण दुरुस्तीसाठी आलेल्या अर्जाची पडताळणी करुन मालमत्ता कर विभाग प्रमुख सुनील भोईर, लिपिक महेश गायकवाड आणि कर्मचारी यांनी तातडीने दुरुस्ती करुन दिली.

कर निर्धारण दुरुस्ती माहिमेअंतर्गत मालमत्तेचे बाह्य स्वरुपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहिली असल्यास, वापरामधील तफावत असल्यास, स्वमालकी असताना भाडेतत्वावर झालेली कर आकारणी झाली असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज सादर करावेत. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्तांना कलम १२९अ नुसार कर आकारणी करण्यात येत आहे. मालमत्ताधारकास या संदर्भात काही हरकत असल्यास त्यांनी आपले हरकती अर्ज सादर करावेत. तसेच पूर्णत्व प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र किंवा वापर दिनांकापासुन कर आकारणी, अनधिकृत शास्ती आकारणी बाबत, प्राथमिक कर आकारणी मध्ये नाव नोंद करणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबात मालमत्ताधारकांच्या काही हरकती असल्यास त्यांनी आपला हरकत अर्ज महापालिकेकडे सादर करावा, असे आवाहनही महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

मालमत्ता धारकांना कलम १२९ अ अन्वये सवलत
कलम १२९अ अन्वये सवलत मागताना, ग्रामपंचायत ॲसेसमेंट उतारा आणि ग्रामपंचायत मध्ये कर भरणा केलेली पावती संबंधीत मालमत्ता धारकांनी सदरची कागदपत्रे जोडुन विनंती अर्ज करावा. सदर अर्जाची तपासणी करुन दखल घेतली जाईल याची मालमत्ता धारकांनी नोंद घ्यावी. तसेच ग्रामपंचायत कालावधीत कर भरणे आवश्यक असतानाही तो भरला नसल्यास, तो व्याजासह किती होतो, याचीही माहीती  मालमत्ताधारकांनी स्वयंस्फुर्तीने सादर करावी, असे महापालिका उपायुक्त गणेश शेटे यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरबे धरण कुठल्याही क्षणी १०० % भरण्याची शक्यता