गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकार तर्फे ८ कोटी रुपये निधी

 रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्या सल्ल्याने काम

 ठाणे : ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी, नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नूतनीकरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

गडकरी रंगायतनमध्ये रंगकर्मींना तसेच प्रेक्षकांना काही असुविधा जाणवत होत्या. त्याबद्दल, तक्रारी आणि सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच राम गणेश गडकरी रंगायतनच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले. त्यात, मूळ वास्तू सुस्थितीत असून, अंतर्गत रचना आणि सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्याप्रमाणे, गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असून, त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. सन १९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या गडकरी रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी गडकरी रंगायतनचे नुतनीकरण होत आहे. गडकरी रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे.

 गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाणार आहे. तसेच, काळानुरुप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, असा उद्देश नजरेसमोर ठेवून गडकरी रंगायत्नचे नूतनीकरण केले जाणार आहे, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

 गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना कलाकार आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षा समजून त्यानुसार अंतर्गत सुविधांची रचना केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदल, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रुममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-पलोरिंग यांचे अद्ययावती  करण, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा,  शौचालयांचे संपूर्ण अद्ययवतीकरण आदी कामांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
 कोणाचीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने गडकरी रंगायतनच्या तारखांचे बुकिंग लक्षात घेवून नूतनीकरण कामे केली जाणार आहेत. तसेच, कमीत कमी कालावधीत काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाईल, असेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

 गडकरी रंगायतन नूतनीकरण मध्ये प्रमुख कामांचा समावेश
संपूर्ण रंगरंगोटी, स्ट्रक्चरल सुधारणा, आवश्यक स्थापत्य कामे, प्लिंथ प्रोटेक्शन, नवीन आसनव्यवस्था, रंगमंच, पडदा, पलोरिंग, विंग्स यांचे नुतनीकरण, पार्किंग व्यवस्था सुधारणा, फॉल सिलिंगचे काम, तालीम हॉलचे नुतनीकरण, अग्निसुरक्षा व्यवस्था नुतनीकरण, शौचालयांचे नुतनीकरण.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली विभागात विजेचा लपंडाव