घणसोली विभागात विजेचा लपंडाव

विद्यार्थ्यांवर मोबाईलच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ!

नवी मुंबई : घणसोलीसह संपूर्ण नवी मुंबईत एकीकडे पावसाने हैरान तर दुसरीकडे महावितरण कंपनीच्या विजेचा सतत लपंडाव यामुळे शालेय विद्यार्थ्यांना चक्क मोबाईलच्या उजेडात आपला अभ्यास पूर्ण करावा लागत आहे. नागरिकांकडून विजेचे भरमसाठ बिले वसुल केले जात असताना, विद्युत पुरवठा मात्र सुरळीत करण्याकडे ‘महावितरण'चे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरापासुन गोठिवली, घणसोली गावात दिवसांतून ६ ते ७ वेळा, रात्री दोन-दोन तास तर कधी कधी संपूर्ण दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत होतो. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी घरी आपला अभ्यास पूर्ण करत असतात. पण, सतत विद्युत पुरवठा
खंडीत होण्याच्या प्रकारामुळे मुलांना चक्क मोबाईलची बॅटरी लावून अभ्यास करावा लागत आहे.

मुंबईच्या तुलनेने नवी मुंबईत विद्युत दर जास्त असल्याने, सर्वसामान्य नागरिकांना महिन्याला २ ते ३ हजार रुपयांची बिले विद्युत विभागाकडून आकारली जातात. पावसाळ्यापूर्वी विद्युत लाईनी दुरुस्ती आणि नवीन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात येते. जेणेकरून पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी असा प्रयत्न विद्युत विभागाचा असतो. परंतु, नवी मुंबईतील घणसोली, गोठिवली विभागातील विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्युत विभागाच्या विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली असता, विभागातील अभियंता आणि विद्युत कर्मचारी यांचे मोबाईल बंद असतात. तर प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली असता विद्युत कर्मचाऱ्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येतात.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जासई विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीचा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते  सत्कार