सीताफळप्रतिकिलो १३०-१५० रुपयांनी विक्री

एपीएमसी मार्केट मध्ये सीताफळ दाखल होण्यास सुरुवात

वाशी : साधारण जून अखेर आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीताफळ हंगामाला सुरुवात होऊन वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात दाखल होते. यंदा दोन ते तीन आठवडे उशिराने घाऊक एपीएमसी फळ बाजारात सीताफळ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या एपीएमसी फळ बाजारात ५-६ गाड्या सीताफळ दाखल होत असून, ऑगस्टमध्ये सीताफळ आवक वाढेल, असे मत एपीएमसी फळ बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात जून अखेर, जुलै महिन्यात सुरुवातीला सीताफळाची आवक होत असून, ऑगस्ट महिन्यामध्ये अधिक प्रमाणात सीताफळ दाखल होण्यास सुरुवात होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत सिताफळाचा हंगाम असतो. मात्र, यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्याने सीताफळ हंगाम देखील लांबला आहे. त्यामुळे बाजारात आता सीताफळ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सीताफळ महाराष्ट्रातील पुणे आणि नगर जिल्ह्यातून दाखल होत असते. सध्या एपीएमसी फळ बाजारात पुणे येथील सीताफळ दाखल होत आहे. सीताफळ उत्पादक शेतकरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात छाटणी करीत असतात. त्यांनतर साधारण एक महिन्याच्या कालावधीत पिकाला पाणी देण्यात येत नाही. त्यानंतर मात्र सीताफळ पिकाला पाण्याची, पावसाची अधिक गरज भासते. सीताफळ परिपक्व होण्यासाठी चार ते साडे चार महिन्याचा कलावधी जातो. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पीकाला पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. परिणामी पीक उत्पादन घेण्यास विलंब होतो. २५ जुलै रोजी एपीएमसी फळ बाजारात सीताफळाच्या ५ ते ६ गाड्या दाखल झाल्या आहेत. घाऊक बाजारात सीताफळ प्रतिकिलो १३०-१५० रुपयांनी विक्री होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव