मंगळवारी दिवसभर मुंबई लेनवर वाहतुक कोंडी सदृष्य परिस्थीती  

सायन पनवेल महामार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपुलावर खडयाचे साम्राज्य  

नवी मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सायन पनवेल महामार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणा-या मार्गावर मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन थेट खारघरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे बुजवून   वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे मंगळवारी दिवसभर मुंबई लेन वरील वाहतुक संथ गतीने सुरू होती. प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला.  

मागील काही दिवसांपासून पडणा-या मुसळधार पावसामुळे सायन पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपुलावर मुंबई लेनवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ड्यामधून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून मुंबई लेनवर हजारो वाहने अडकुन पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खारघर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुक पोलिसांनी हलक्या वाहनांना पाम बीच मार्गावरुन सोडून सायन पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.  

त्यानंतर वाहतुक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुरुस्ती पथकाच्या मदतीने भर पावसात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम केले. मात्र दिवसभर पावसाची संततधार सुरु असल्याने खडे बुजवण्यात अडचणी येत होत्या.अशा परिस्थीत सीबीडी वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन वाहतूक नियमन केले. मात्र दिवसभर सायन पनवेल मार्गावरील मुंबई लेन वरील वाहतुक संथ गतीने सुरू होती. याचा फटका मुंबईच्या दिशेने जाणा-या वाहनांना व त्यातून प्रवास करणा-या प्रवाशांना बसला.  

दरम्यान, भर पावसात वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याची तसेच रात्री खड्डे भरलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सीबीडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मणिपूर घटनेतील सर्व दोषी व्यक्तींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी