नवी मुंबईतील ४ अनधिकृत शाळांविरुध्द फौजदारी गुन्हे

शिक्षण विभागाच्या नोटिसांकडे दुर्लक्ष करुन राजरोसपणे शाळा सुरु

तुर्भे : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ४ अनधिकृत शाळांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. या संदर्भात महापालिकेच्या शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. त्यामुळे सदर शाळांच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत.

सन २००० पासून महापालिका क्षेत्रात सुमारे ३५ अनधिकृत शाळाची नोंद होती. या अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाकडून वारंवार शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या जात होत्या. या नोटिसांना दाद न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच्याही नोटिसा बजावल्या जातात. त्यामुळे या ३५ पैकी काही शाळा बंद झाल्या, तर काही शाळांना शासनाकडून मान्यता मिळाली आहे. तर महापालिकेने बजावलेल्या नोटिसांना काही शाळांचे संचालक गांभीर्याने घेत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच या शाळा राजरोसपणे चालू होत्या. अखेर राज्याच्या शिक्षण विभागाने अशा शाळांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या महापालिका हद्दीत सुरु आसलेल्या ४ शाळांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ मार्च, २०२३ अखेर ५ प्राथमिक शाळा शासनाची, नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम २००९ मधील कलम-१८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालवता येत नाही. त्यानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५ शाळा मान्यतेशिवाय सुरु असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने शाळा तात्काळ बंद कराव्यात, अशा आशयाच्या त्यांना नोटिसा बजावल्या होत्या.

यामध्ये इस्माईल एज्युकेशन ट्रस्टची सीबीडी, सेक्टर-८ बी (आर्टिस्ट व्हिलेज) येथील अल मोमीन स्कुल, इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब-सेवटर-२७ नेरुळ, सेक्टर-४० सीवुडस्‌ येथील द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल, सरस्वती विद्यानिकेतन स्कुल-घणसोली, येथील इलिम इंग्लिश स्कुल-रबाले आंबेडकर नगर या ५ शाळा राजरोसपणे चालू होत्या. त्यापैकी सरस्वती विद्यानिकेतन स्कुल बंद झाली आहे. त्यामुळे अन्य शाळांच्या संचालकांवर आता फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३ ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन; अनेक धोरणात्मक निर्णयांना मिळणार मंजुरी